मुक्त ही संकल्पना राजकारणात चालते, संघात नाही- डॉ. मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 01:12 PM2018-04-01T13:12:17+5:302018-04-01T13:12:17+5:30
मुक्त ही संकल्पना राजकारणात चालते, संघात नाही. आम्हाला राष्ट्रबांधणीसाठी विरोधकांसह सर्व समाज संघटित करायचा आहे.
पुणे : मुक्त ही संकल्पना राजकारणात चालते, संघात नाही. आम्हाला राष्ट्रबांधणीसाठी विरोधकांसह सर्व समाज संघटित करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्व या संकल्पनेचा काही लोकांकडून किस पडला जातो. मात्र, हिंदुत्व म्हणजे स्वतःबरोबरच कुटुंब, देश, जग, मानवता आणि सृष्टीवर असलेली श्रद्धा हे समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे प्रसिद्ध लेखक व भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या तसेच अनुवादित केलेल्या माती, पंख नि आकाश, पासपोर्ट मॅन आॅफ इंडिया, शांती की अफवांए, होतच नाही सकाळ, ज्ञानेश्वर मुळे की कविताएः प्रातिनिधिक संकलन या पुस्तकांचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय धोरणविश्लेषक, विचारवंत डॉ. संदीप वासलेकर उपस्थित होते रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला.
भागवत म्हणाले, 'ज्याचे विचार आपल्याला पटत नाहीत, जो आपला विरोधक आहे, त्यांना बरोबर घेऊन राष्ट्रबांधणीच्या ध्येयकडे वाटचाल करणे, युरोपियन लोकांना जमले. भारताला ते अद्याप जमलेले नाही. मागील चुका दुरुस्त करून एकमेकांना साथ देत, परंपरेचे भान बाळगत सकारात्मक वाटचाल राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची आहे.' 'ज्याला सर्वसामान्यांच्या भाषेत बोलता येत नाही तो प्रशासन कसे चालावणार. नोकरशाहीला नकारशाहीकडून होकारशाहीकडे न्यायचे असेल तर मातीशी नाळ जुळलेला प्रशासक हवा, असेही त्यांनी नमूद केले.