शासकीय मदतीविना अष्टापूर गावांत हरितग्रामची संकल्पना सत्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:09 AM2021-03-20T04:09:44+5:302021-03-20T04:09:44+5:30
गावातला डोंगर तुमचा... आसपासचे जंगल तुमचे...तिथली मंदिरं, पाण्याची टाक्या सर्व काही तुमचे, त्यांचे संवर्धन करण्याकडे जबाबदारी म्हणून बघू नका, ...
गावातला डोंगर तुमचा... आसपासचे जंगल तुमचे...तिथली मंदिरं, पाण्याची टाक्या सर्व काही तुमचे, त्यांचे संवर्धन करण्याकडे जबाबदारी म्हणून बघू नका, जितके स्वच्छ तुमचे घर ठेवतात, तितक्याच आत्मीयतेने तुमच्या परिसरातील या निसर्गाच्या अनमोल ठेव्याचे नि आपल्या महान वारशाचे जतन करा'' या ध्येयाने प्रेरित होऊन येथील नागरिक लावलेले वृक्षांची आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे जपणूक व जोपासना करण्याचे कार्य करत आहेत.
अष्टापूर ग्रामस्थांनी गावात विविध विकासकामांसह शाळाही आदर्श व सुसज्ज केली आहे. दुष्काळी व प्रतिकूल परिस्थितीत येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून सुमारे २५ हजार झाडांची वनराई करून पर्यावरण जपले आहे. गावातील रस्ते, शाळा, सार्वजनिक ठिकाणे, तसेच माळरानावरही झाडे लावल्याने गाव परिसर हिरवाईने नटलेला दिसत आहे. फळाफुलांच्या झाडांबरोबरच वड, चिंच व करंज अशा मोठ्या झाडांचाही यात समावेश असल्याने गावात ग्रामस्थांना विसाव्यासाठी ठिकठिकाणी सावलीही उपलब्ध झाली आहे.
गावात प्रत्येक घरापुढे झाड आहे. दशक्रिया विधीही वनराईच्या सावलीत होतो. प्रत्येक झाडाला ठिबकणे पाणी देत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. घनदाट वृक्षराजीमुळे या परिसरात पाऊल ठेवताच कोकण अथवा केरळमध्ये आल्याचा भास होतो. सर्व रस्ते, मोकळ्या अथवा पडीक जागा तसेच घर तेथे झाड लावण्यात आल्याने सध्याच्या भर उन्हाळ्यातही गारवा शीतलतेचा आनंद मिळतो आहे. मान्यवरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामस्थ दरवर्षी वृक्षारोपण करतात. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेली ही वृक्षलागवड २५ हजारांवर गेल्याचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप यांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडे जमा होत असलेल्या एकूण रकमेपैकी ३५ टक्के रक्कम या कामासाठी खर्च होते. शासनाच्या निधीविना मोठ्या प्रमाणावर केलेली वृक्षलागवड पाहण्यासाठी अथवा ग्रामस्थांचे कौतुक करण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी वा पदाधिकारी फिरकला नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सरकारने गायरान हद्द मोजून कायम करून दिल्यास तेथेही वृक्षलागवड करण्याची येथील ग्रामस्थांची तयारी आहे.
सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या अष्टापूर ग्रामपंचायतीत अकरा सदस्य आहेत. ग्रामपंचायत आय.एस.ओ. मानांकित व संगणकीकृत कारभार असून, सुसज्ज ग्रामपंचायत इमारत, नळ पाणीपुरवठा, रस्ते, सुसज्ज शाळा, अंगणवाड्या, कॉम्प्युटर लॅब अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, गावाला घरपट्टीतून मिळणारे उत्पन्न अडीच लाख आहे. गावात चिंच, करंज, सीताफळ, नारळ यांसह अनेक फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी या झाडांचे उत्पन्न वाढत असून, नजीकच्या काळात फळांच्या उत्पन्नातून ग्रामस्थांना कर सवलत देण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प आहे. त्यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांचेसमवेत सरपंच कविता जगताप, उपसरपंच कालिदास कोतवाल, माजी सरपंच अण्णासाहेब कोतवाल, माजी उपसरपंच श्यामराव कोतवाल, आबासाहेब कोतवाल, योगेश जगताप, सोमनाथ कोतवाल, सुभाष कोतवाल, संजय कोतवाल, गणेश कोतवाल, भैरवनाथ प्राथमिक दिंडीचे सचिव संजय कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते महेश ढवळे, नवनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, मनोज कोतवाल, उमेश कोतवाल, सचिन माकर व माजी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.