आरोग्य स्वराज्य संकल्पना रुजावी
By Admin | Published: February 14, 2015 11:55 PM2015-02-14T23:55:29+5:302015-02-14T23:55:29+5:30
सध्याचे आरोग्यशास्त्र तांत्रिक आणि यांत्रिक बनले आहे. रुग्णालयांमधील महागडे उपचार आणि मेडिक्लेम कंपन्यांवर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.
पुणे : ‘‘सध्याचे आरोग्यशास्त्र तांत्रिक आणि यांत्रिक बनले आहे. रुग्णालयांमधील महागडे उपचार आणि मेडिक्लेम कंपन्यांवर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे. असे परावलंबन माणसाला गुलाम बनविते. यातून लोकांना मुक्त करण्यासाठी आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजण्याची गरज आहे. यातून केवळ उपचार नाही, तर आरोग्याविषयी जनजागृतीचा ध्यास घ्यायला हवा,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
मुकुंदनगर येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या २६व्या पदवी प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग आणि ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर यांना विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. राणी बंग यांनी ही पदवी स्वीकारली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. अभय बंग उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी विद्यापीठाचे कुलपती निवृत्त न्यायाधीश विश्वनाथ पळशीकर, कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ८४ जणांना पीएच.डी. पदवी, तर विविध विद्याशाखांतील एकूण ४४५६ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आली. विविध विषयांत प्रथम आलेल्या पाच जणांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले.
डॉ. बंग म्हणाल्या, ‘‘महात्मा गांधी व लोकमान्य टिळकांमधील स्वराज्य हा समान दुवा होता. हा वसा आता आम्ही घेतला आहे. या संकल्पनेला आरोग्याशी जोडून ‘आरोग्य स्वराज्या’चे ध्येय निश्चित करून काम सुरू केले. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात काम करताना तेथील समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विज्ञानाची जोड देत सेवा व संशोधनात समन्वय साधला. आरोग्य स्वराज्य या संकल्पनेची ताकद खूप मोठी आहे. आज आपल्या समाजात चंगळवाद फोफावला आहे. आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यातच समाजात आरोग्याबाबत परावलंबित्व निर्माण होत आहे. यातून बाहेर काढण्यासाठी चांगल्या उपचारांची गरज नाही, तर आरोग्याविषयी जागृत करणे गरजेचे आहे.’’
सर्वसामान्यांना रुचेल असे संशोधन करण्याची अपेक्षा डॉ. ढवळीकर यांनी व्यक्त केली. विश्वसनीय पुराव्याअभावी केलेले संशोधन टिकत नाही. मुंबई येथे झालेल्या सायन्स काँग्रेसमध्ये असेच अविश्वसनीय पुराव्यांच्या आधारे संशोधन मांडण्यात आल्याचे डॉ. ढवळीकर यांनी सांगितले. पळशीकर व डॉ. टिळक यांनीही मनोगत व्यक्त केले.
४आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात सुसंस्कृतपणा नसतो, असे अनेक शिकलेले लोक म्हणतात.
४पण, खरे तर आदिवासीच जास्त सुसंस्कृत असतात, असे स्पष्ट करून डॉ. राणी बंग म्हणाल्या, ‘‘शिक्षण व सुसंस्कृतपणाचा कवडीचाही संबंध नाही.
४आदिवासी कधीही खोटे बोलत नाहीत, चोरी करीत नाहीत, स्त्रियांवर अत्याचार करीत नाहीत. तेथील निर्णयप्रक्रिया सामूहिक असते.’’