कुकडी खोऱ्यातील पाणीसाठा चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:26+5:302021-08-20T04:14:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दर वर्षी १५ ऑगस्टपर्यंत सर्व धरणे शंभर टक्के भरतात. परंतु, यंदा जुलैत झालेल्या मुसळधार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दर वर्षी १५ ऑगस्टपर्यंत सर्व धरणे शंभर टक्के भरतात. परंतु, यंदा जुलैत झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने भीमा-कृष्णा खोऱ्यातील काही धरणे शंभर टक्के भरली असली, तरी सरासरी पाणीसाठा ७७ टक्के एवढाच झाला आहे. यामध्ये कुकडी खोऱ्यातील पाणीसाठा अधिकच चिंताजनक असून, सध्या केवळ ५५ टक्केच पाणीसाठा जमा झाला आहे.
प्रशासनातर्फे १५ ऑगस्टपर्यंत धरणांतील पाणीसाठा गृहीत धरून नियोजन केले जाते. यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर एक-दीड महिना पावसाने दडी दिली. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुण्यासह संपूर्ण राज्यातच मुसळधार पाऊस झाला. तीन-चार दिवसांच्या धुवाधार पावसाने पाणी-पाणी केले. याच पावसात भीमा व कृष्ण खोऱ्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली. यामध्ये भीमा खोऱ्यातील पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा खोऱ्यात ९६ टक्के पाणीसाठा, नीरा खोरे ९२ टक्के पाणीसाठा, तर कुकडी खोऱ्यात ५५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या तिन्ही खोऱ्यांतील धरणे मिळून भीमा उपखोऱ्यातील धरणांत ७७ टक्के पाणी जमा झाले आहे.
------
‘कुकडी’वर ३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे भवितव्य
कुकडी खोऱ्यात नाझरे, पिंपळगाव जोगे, येडगाव, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी, डिंभे आणि घोड या आठ धरणांचा समावेश आहे. या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाण्यावर पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. ‘कुकडी’ची एकूण प्रकल्पीय क्षमता ३५.५० टीएमसी आज अखेरपर्यंत येथे १९.७४ टीएमसी साठा जमा झाला आहे. या पाण्यावर पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांची बागायती व ऊसशेतीचे भवितव्य अवलंबून आहे. यामुळे जिल्ह्यासह कुकडी प्रकल्पाला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.