पुण्यातल्या ‘कराची स्वीट’बद्दल शिवसेनेला जिव्हाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:34+5:302020-11-22T09:39:34+5:30
लक्ष्मण मोरे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘कराची’ नावाने असलेल्या मिठाई दुकानांच्या पाट्या तात्काळ हटविण्याचा सूर शिवसेनेने मुंबईत आळवला. ...
लक्ष्मण मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘कराची’ नावाने असलेल्या मिठाई दुकानांच्या पाट्या तात्काळ हटविण्याचा सूर शिवसेनेने मुंबईत आळवला. पुणेकर शिवसैनिकांना मात्र पुण्यातल्या ‘कराची’ मिठाई दुकांनांबद्दल कोणताही आक्षेप नाही. उलट ‘कराची’ नावाने दुकाने चालवणाऱ्या सिंधी व्यावसायिकांच्या कष्टाबद्दल आदरच आहे.
पुण्यात ‘कराची स्विट होम’ आणि ‘कराची स्विट मार्ट’ या नावाची तीन दुकाने आहेत. या दुकानांना आमच्याकडून कोणताही त्रास होणार नसल्याचेही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बुधवार पेठेत ‘कराची स्विट होम’ आहे. लष्कर परिसरातले ‘कराची स्विट मार्ट’ प्रसिद्ध आहे. त्यांची दुसरी शाखा कोरेगाव पार्क परिसरात आहे. बुधवार पेठेतील कराची स्विट होमचे व्यवस्थापक हिरा राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दुकान साधारणपणे ९० वर्षांपुर्वी पुण्यात सुरु झाले. सिंध प्रांतातून पुण्यात आलेल्या बतीजा नामक व्यक्तीने मिठाईचा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय आजही तेवढ्याच निष्ठेने सुरु असल्याचे हिरा म्हणाले.
कोरेगाव पार्कमधील कराची स्विट मार्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाले. फाळणीमुळे पाकिस्तानातून भारतात आलेल्या ताराचंद अथवानी यांनी कुटुंबियांसह पुण्यातील ‘रेफ्युजी कॅम्प’मध्ये आसरा घेतला. काही महिन्यातच त्यांनी लष्कर परिसरातील शिवाजी मार्केटमध्ये छोटे दुकान सुरु केले. पाहता पाहता त्यांची सिंधी मिठाई पुणेकरांच्या पसंतीस उतरली. आज कुमार अथवानी आणि त्यांचे कुटुंबिय हा व्यवसाय चालवतात.
पुण्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये चवदार मिष्ठान्नांची भर घालणारी ही दुकाने प्रामुख्याने फाळणीची आणि स्वातंत्र्याचे साक्षीदार आहेत. सिंधी नागरिक फाळणीवेळी अनन्वित अत्याचार सहन करुन कसेबसे भारतात आले. यातले अनेकांना तर अंगावरच्या नेसत्या वस्त्रासह, सगळी संपत्ती पाकिस्तानात सोडून यावे लागले. मात्र येथे आल्यावर नव्या उमेदीने त्यांनी व्यवसाय उभे केले. ‘कराची’नावाने व्यवसाय करणाऱ्यांसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शहर शिवसेनेची भूमिका वेगळी असणार नाही असे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
चौकट
सेनेचे शहरप्रमुखांचे मूळ ‘कराची’च
शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांचे आजोबा काशिराम राणोजी मोरे आणि वडील कराचीचेच आहेत. कराचीमध्ये त्यांचा दुधाचा मोठा व्यवसाय होता. कराचीत त्यांचा ४० खणी वाडा होता. फाळणीनंतर या वाड्यात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे वास्तव्य होते. कराचीत राहणाऱ्या मोरे कुटुंबाकडे त्याकाळी अडीचशे गायी होत्या. मोरे यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यात आहे. सरदार ठुबे यांच्याशी त्यांचा घरोबा होता. ठुबे यांच्या सांगण्यावरुन पुण्यात त्यांनी जागा घेतल्या होत्या. मात्र त्यांचे पणजोबा आणि आजोबा व्यवसायानिमित्त कराचीला स्थायिक झाले. फाळणीनंतर हे सर्व कुटुंब बोटीने समुद्रमार्गे मुंबईला आले. त्यांच्या आजोबांना देण्यात आलेले ‘रेफ्युजी कार्ड’ आजही जपून ठेवले आहे, असे संजय मोरे यांनी सांगितले.