चालू वर्षाचा मिळकतकर भरणाऱ्यांना सवलतीची मुदत ३० जूनपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:32+5:302021-06-02T04:09:32+5:30
पुणे : महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षाचा संपूर्ण निवासी मिळकत कर पहिल्या दोन महिन्यांत भरणाऱ्यांना देण्यात येणारी १५ टक्के सवलतीचा ...
पुणे : महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षाचा संपूर्ण निवासी मिळकत कर पहिल्या दोन महिन्यांत भरणाऱ्यांना देण्यात येणारी १५ टक्के सवलतीचा कालावधी १ महिन्यानी वाढविण्यात आला आहे़ परिणामी मिळकत करधारकांना आता ३० जूनपर्यंत सवलतीसह आपला मिळकत कर भरता येणार आहे़ याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली़
दरम्यान, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांचा कर न भरल्यास १ जुलैपासून आकारण्यात येणारी शास्ती (व्याज) ही १ ऑगस्टपासून लागू करण्याबाबत या वेळी निर्णय घेण्यात आला आहे़
शहरातील मिळकत करधारकांना की जे चालू वर्षाचा मिळककर पहिल्या दोन महिन्यांत एकरकमी भरतात, त्यांना महापालिकेकडून दर वर्षी १० टक्के सवलत दिली जात होती़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी या सवलतीत ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे़ परंतु, गेल्यावर्षीप्रमाणेही यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने फेब्रवारी महिन्यापासून शहरात डोके वर काढल्याने, अनेकांना घराबाहेर पडता आले नाही़ तसेच अनेक जण आर्थिक अडचणीतही सापडले गेल्याने, अनेकांना इच्छा असूनही वेळेत कर भरता आला नाही. त्यामुळे नागरिकांना करात सवलत मिळण्याची मुदत एक महिन्याने वाढवून ती ३० जूनपर्यंत करण्याचा प्रस्ताव शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार,विशाल धनवडे आदींनी मांडला होता़ त्यास आजच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली असल्याचे रासने यांनी सांगितले़
------------------------