शहर, जिल्ह्यात ९ लाख शिधापत्रिकाधारकांना सवलतीत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:36+5:302021-05-28T04:08:36+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारने एप्रिल आणि मे महिन्यात कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे अनेक जणांचा रोजगार गेल्याने ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारने एप्रिल आणि मे महिन्यात कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे अनेक जणांचा रोजगार गेल्याने ते घरीच बसून आहे. या संकटामुळे मे महिन्यात राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने मोफत धान्य, तर जून महिन्यात फक्त केंद्र शासनाकडून मोफत धान्य वाटप होणार आहे. राज्य शासनाकडून केसरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यापासून प्रत्येक कुटुंबाला प्रतिमाणसी ३ रुपये किलो या दराने तांदूळ आणि २ रुपये किलो या दराने गहू देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील आता याचा फायदा होणार आहे. जूनमध्ये हे वाटप होणार आहे, तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यात मे आणि जून महिन्यात मोफत धान्याचे वितरण सुरू राहणार आहे.
-----
जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक :- ८ लाख ८९ हजार ७९५
बीपीएल/अंत्योदय :- ५६ हजार ८२०
केशरी :- ८ लाख ३२ हजार ९७३
----
बीपीएलच्या ५६ हजार कुटुंबांना लाभ (बॉक्स)
आतापर्यंत पुणे शहर (८ हजार १९१) आणि जिल्ह्यातील (४८ हजार ६२९ अशा एकूण ५६ हजार ८२० लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे.
----
‘केशरी’च्या ८ लाख कार्डधारकांना मिळणार फायदा
आता नव्या घोषणेनुसार पुणे शहर (३ लाख ८ हजार ८४४) आणि जिल्ह्यातील ५ लाख २४ हजार १२९ अशा एकूण ८ लाख ३२ हजार ९७३ लोकांना मे आणि जून महिन्यात सवलतीत धान्य मिळणार आहे. इतर वेळेस हे गहू आणि तांदूळ प्रतिकिलो ३ आणि ४ रुपयांनी मिळत असते.
---
काय मिळणार? (बॉक्स)
प्रतिमाणसी
- ३ किलो गहू
- ३ किलो तांदूळ
---
महाराष्ट्र सरकार आणि केंद्राचे मोफत धान्य मे महिन्याचे ९० टक्के वाटप पूर्ण झाले आहे. पुढील दोन-तीन दिवसात उरलेले १० टक्के वाटप होईल. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील मोफत धान्य जून महिन्याचे १ तारखेपासून धान्य वाटप सुरू करण्यात येणार आहे.
- भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी