वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला सजग पुणेकराने शिकवला चांगलाच धडा; विनामास्क कारवाईत दंड भरण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 03:35 PM2021-04-06T15:35:37+5:302021-04-06T20:31:11+5:30
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे विनामास्क फिरणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. पण हेच पोलीस दंडाची पावती फाडताना विनामास्क होते. कोरोना लाट येण्याआधीचा व्हिडीओ होता. एका पुणेकर तरुणाने त्याबाबत दाद मागितली होती.
पुणे: पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे विनामास्क फिरणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रत्येकी ५००रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. आतापर्यंत विनामास्क कारवाईसाठी पुणेकरांनी तब्बल १३ कोटींच्यावर दंड भरला आहे. मात्र, एका सजग पुणेकराने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या वाहतूक महिला पोलिस कर्मचाऱ्यालाच चांगलीच अद्दल घडवली आहे. नुकतेच महापालिकेने त्या महिला कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
पुणे वाहतूक शाखेच्या वंदना संजय आल्हाट या महिला पोलीस कर्मचाऱ्याने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना स्मितेश रासम यांच्यावर कारवाई केली होती. मात्र, गंमत म्हणजे त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करताना संबंधित वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्याने देखील मास्क परिधान केला नव्हता.या प्रसंगाचा व्हिडिओ रासम यांनी काढला. तसेच तो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून १७ फेब्रुवारी २०२१ रोजी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख,पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुणे पोलीस, पुणे महापालिका यांना टॅग करत प्रसिद्ध देखील केला होता.
https://twitter.com/smiteshrasam/status/1362078960243236874?s=1002
या ट्विटची दखल घेत पुणे महापालिकेने सोमवारी वंदना आल्हाट या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ठिकाणी मास्क न वापरल्याच्या कलमाखाली ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे विनामास्क कारवाईच्या नावाखाली नेहमीच पुणेकरांच्या खिशात हात घालणाऱ्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच दणका दिला आहे.