पार्किंगच्या अटी-ठेकेदारांकडून वाहनचालकांची फसवणूक? पार्किंगच्या अटी-शर्तीचा भंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 07:00 AM2019-08-10T07:00:00+5:302019-08-10T07:00:12+5:30
शहरामध्ये सुमारे ८ ते १० ठिकाणी महापालिकेकडून पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पुणे : शहराच्या विविध भागामध्ये महापालिकेकडून ठेकेदारी पध्दतीने पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु याताली अनेक ठिकाणी ठेकेदारांकडून वाहनतळाबाबत घातलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काही वाहनतळांची पाहणी केली. यामध्ये महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणे, सीसीटीव्ही कॅमेरे न लावणे, महापालिकेच्या निविदांमध्ये घातलेल्या अटीचा भंग करण्यात आल्याचे लक्षात आले. याबाबत मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सर्व ठेकेदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
याबाबत मुठे यांनी सांगितले की, शहरामध्ये सुमारे ८ ते १० ठिकाणी महापालिकेकडून पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया राबवून खाजगी ठेकेदारांना या जागा पार्किंगसाठी चालविण्यास देण्यात आल्या आहेत. परंतु निविदामध्ये घातलेल्या अनेक अटी व शर्तीच्या ठेकेदारांकडून भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा शहरातील सर्व पार्किंग ठेकेदारांना नोटीसा देऊन वाहनतळांची वार्षिक द्ये रक्कम त्वरीत भरणे, कर्मचा-यांना आयकार्ड देणे, नागरिकांशी गैरवर्तन केल्यास कर्मचा-यांवर कारवाई करणे, पार्किंगचे दर पत्रक दर्शनी भागावर लावणे, वाहनतळाची नियमित स्वच्छता करणे आदी अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.
--------------------
पार्किंग शुल्क पावती संगणकीकृत करणे
शहरातील सर्व पे अॅन्ड पार्कच्या ठिकाणी पार्किंग शुल्क वसुली पावत्याांचे संगणकीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी छापील पावत्या दिल्या जातात. यामध्ये इन व आऊट टाईमचा उल्लेख नसतो. तसेच पावतीवर ठेकेदारांचे नाव व फोन नंबर देणे देखील आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना काही तक्रार असल्यास थेट ठेकेदारांशी संपर्क करता येईल. यामुळे शहरातील सर्व पे अँड पार्क च्या ठिकाणी संगणकीकरण करुन घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.