रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:57+5:302021-04-14T04:09:57+5:30
दिवसभर फिरून सुद्धा बेड न मिळाल्याने हताश होऊन घरी परतावे लागत आहे. तर काहींना उपचार किंवा बेड मिळत नसल्याने ...
दिवसभर फिरून सुद्धा बेड न मिळाल्याने हताश होऊन घरी परतावे लागत आहे. तर काहींना उपचार किंवा बेड मिळत नसल्याने रुग्णांना वाटेत अथवा घरीच जीव सोडवा लागला. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे रुग्णालयात बेड मिळूनही रुग्णांना हाल सोसावे लागत आहेत. नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितलेली औषधे तसेच इंजेक्शन मिळविण्यासाठी शहरातील मेडिकल मध्ये फिरावे लागत आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे मोकळ्या हाताने परतावे लागते आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारात आपण कुठे कमी पडूतो की काय, अशी मानसिकता दिसून येऊ लागली आहे. त्यात सरकारी कोविड सेंटरच्या बाहेर काही नातेवाईकांना पदपथावर झोपून रात्र काढण्याची पाळी आली आहे. कडक निर्बंध लागू केल्याने अत्यावश्यक सेवा सोडता इतर दुकाने , सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने नातेवाईकांना चांगलेच हाल सोसावे लागत आहेत.
नातेवाईकांकडे जाता येत नाही अन् दुकानात काही मिळत नाही
कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांना रुग्णालयात जाऊन भेटता येत नाही. तसेच त्याला सोडून रुग्णालयाच्या आवारा बाहेर पडता येत नाही. तसेच जेवणासाठी किंवा थोड्याशा विश्रांतीसाठी, मनमोकळे करण्यासाठी कोणत्या नातेवाईकाकडे ही जाता येत नाही. कडक निर्बंधांमुळे दुकाने देखील बंद असल्याने तिथेही काही मिळात नाही. अशी चहूबाजूंनी कोडी झाली आहे. त्यामुळे जीव मेटाकुटीला आला आहे. असे नातेवाईकांनी सांगितले.
नातेवाईकांच्या प्रतिक्रिया
मोठा भाऊ कोरोनाबाधित झाल्यामुळे त्याला बेड मिळवून देण्यासाठी रात्रभर फिरावे लागले. डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले. त्यानुसार गेल्या तीन चार दिवसांपासून दिवसभर
फिरुन सुद्धा इंजेक्शन मिळत नव्हते. आता रुग्णालयातच इंजेक्शन मिळणार असे सांगितले मात्र त्यांच्याकडेच अजून ते उपलब्ध झाले नाही. त्यामुळे टेंशन आहे.
- आशिष भोसले,
कोरोना हा गरिबांना न परवडणारा रोग आहे. सरकारी रुग्णालयात म्हणा अथवा कोविड सेंटरला देखील बेड मिळत नाही. जम्बो रुग्णालयात बेड मिळेल अशी अपेक्षा होती मात्र जागा नसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. कडक निर्बंधांमुळे रुग्णालयात येता जाता त्रास सहन करावा लागत आहे.
- राजू परदेशी.
गेल्या पाच दिवसांपासून कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. परिचारिका सांगतात त्यानुसार प्रकृती ठीक आहे. फोनवर बोलता येते. भेट न झाल्याने काळजी वाटते. त्रास कमी होत असल्याने औषधे बाहेर आणावी लागत नाहीत. कडक निर्बंधांमुळे कामावर जावून पुन्हा कोविड सेंटरवर येणं त्रासदायक ठरत आहे.
- मीना साठे.
*