Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:34 PM2021-12-06T16:34:24+5:302021-12-06T16:34:36+5:30
कोरोना बाधीत रुग्णांवर जे उपचार केले जातात त्याप्रमाणेच या सहा जणांवर उपचार केलं जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने वेगळे उपचार देण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
पिंपरी : शहरातील सहा जणांचा ओमायक्रॉन तपासणी अहवाल रविवारी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. परंतु या सहा रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या सहा जणांपैकी एकाला सौम्य लक्षणे आहेत, तर इतरांना कोणतीही लक्षणे नाहीत, अशी माहिती महापालिका वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. चौदा दिवस रुग्णांना येथे ठेवण्यात येणार आहे. चौदा दिवसांनंतर पून्हा यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी- चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण सहा जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह भावाला भेटण्यासाठी २४ नोव्हेंबरला पिंपरी -चिंचवड येथे आली होती. त्या तिघींना ओमायक्रॉन लागण झाली असल्याच्या रिपोर्ट एनआयव्हीने दिली आहे. तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ नागिरकांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा ४५ वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोरोनाबाधित आल्या होत्या. या तिघांमध्येही ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.
कोरोनावरील पूर्वीचेच उपचार सरु
ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असणारे सहाही रुग्ण जिजामाता रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पैकी एकाही रुग्णाला तिव्र स्वरुपाची लक्षणे नाहीत. सात वर्षांच्या मुलीला सुरुवातीला सर्दीची सौम्य लक्षणे होती. मात्र, आता तीही नाहीत. सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी स्थिर आहे. कोणत्याही रुग्णाला विशेष लक्षण दिसून आले नाही. कोरोना बाधीत रुग्णांवर ज्या प्रकारे उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर असल्याने वेगळे उपचार देण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.
''परदेशातून आलेल्या नागरिकांची सर्वेक्षण सुरु आहेत. तसेच जे नागरिक या महिन्याभरात परदेशवारी करून आले आहेत, त्यांनी आपली करोना तपासणी करून घ्यावी. सध्याचे सहाही रुग्ण स्थिर आहेत. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. कोनोना नियमांनुसारच त्यांच्यावर उपचार केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाचे सर्व नियम पाळावेत असे वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले आहे.''