सुवर्णपदकासाठी पुणे विद्यापीठात शाकाहारीची अट!, विद्यार्थ्यांकडून परिपत्रकाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:27 AM2017-11-11T05:27:10+5:302017-11-11T06:20:14+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावाने देण्यात येणा-या सुवर्णपदकासाठी शाकाहारी असण्याची अट विद्यापीठाने घातल्यामुळे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावाने देण्यात येणाºया सुवर्णपदकासाठी शाकाहारी असण्याची अट विद्यापीठाने घातल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, खानपानाच्या विविधतेवरून भेदभाव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या परिपत्रकाची होळी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून गेल्या काही वर्षांपासून शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यात येते. २०१६-१७ या वर्षीच्या सुवर्णपदकासाठी महाविद्यालये व विद्यापीठाच्या विभागांनी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे परिपत्रक शैक्षणिक प्रवेश विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. या परिपत्रकात सुवर्णपदकासाठी घालण्यात आलेल्या अटी भेदभाव करणाºया असल्याने त्याचा विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
दरम्यान, हे सुवर्णपदक २००६पासून देण्यात येते. त्याचे निकषही तेव्हापासून आहेत. शैक्षणिक गुणवत्ता, खेळाडू, निव्यर्सनी व शाकाहारी विद्यार्थ्यांस प्राधान्य दिले जाते. विद्यापीठ आहाराबाबत भेदभाव मानत नाही. देणगीदारांशी चर्चा करून आहाराच्या निकषांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
टिष्ट्वटरवरून आदित्य ठाकरेंनी पुणे विद्यापीठावर घेतला आक्षेप
मुंबई : मुंबई विद्यापीठानंतर आता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पुणे विद्यापीठावर निशाणा साधला आहे. पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकावर आक्षेप घेत, विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे आणि करिअरकडे लक्ष द्यावे, खाण्याकडे नाही, असे टिष्ट्वटरच्या माध्यमातून त्यांनी सुनावले आहे.
पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा असे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी काय खावे हे विद्यापीठाने ठरवू नये असे आदित्य यांनी म्हटले आहे.