हातावर पोट असलेल्या श्रमिकांचे हाल
By admin | Published: November 17, 2016 03:39 AM2016-11-17T03:39:56+5:302016-11-17T03:39:56+5:30
रोजंदारीवर काम करणारे कामगार, मजूर यांना जगण्यासाठी रोजचे रोज दैनंदिन वस्तू खेरदी कराव्या लागतात.
पिंपरी : रोजंदारीवर काम करणारे कामगार, मजूर यांना जगण्यासाठी रोजचे रोज दैनंदिन वस्तू खेरदी कराव्या लागतात. त्यांना ठेकेदारामार्फत आठवड्याला पगार दिला जातो. ही पगाराची रक्कम ठेकेदार जुन्याच नोटांच्या स्वरूपात देत आहेत. दैनंदिन व्यवहार करताना, त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या श्रमिकांचे हाल होत आहेत.
केंद्र शासनाने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवाच्या ठिकाणी नोटा वापरण्याची सुविधा आहे. मात्र, शहरातील विविध भागातील बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. दुष्काळा भागासह परराज्यातील मजूर याठिकाणी रोजंदारीची कामे करीत आहेत. हातावरचे पोट असल्याने रोजच्या रोज त्यांना भाजीपाला, अन्य जीवनाश्यक वस्तू खरेदी कराव्या लागतात. परंतु त्याला प्रत्येक वेळी सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. जुन्या नोटा स्वीकारण्याशिवाय मंजुरांपुढे दुसरा पर्याय नाही. पाचशेच्या नोटा घेणार असाल, तरच काम देऊ, असे ठेकेदार सांगतात. त्यामुळे रोजंदारीवरील मजुरांना या नोटा स्वीकारण्याशिवाय पर्याय उरत नाही. पैसे असूनही त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.(प्रतिनिधी)
रोख वेतनाने अडचणी...
बहुतांश मजुरांचे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खातेही उघडलेले नाही. ठेकेदार त्यांना चलनातून रद्द झालेल्या हजार, पाचशेच्या नोटा देत आहेत. या नोटा बदलून घेण्यासाठी त्यांना बँक खाते उघडण्यापासूनची धावपळ करावी लागते आहे. अशीच परिस्थिती हॉटेल, गॅरेज आणि ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांची झाली आहे. काही हॉटेल व्यावसायिक, ट्रान्सपोर्टवाल्यांनी काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी मजुरांच्या हातावर हजार, पाचशेच्या नोटा ठेवल्या आहेत. आतापर्यंत नेहमी बँकेत पगार जमा करणाऱ्यांनी या वेळी रोख स्वरूपात मागील महिन्याचे वेतन दिले आहे.