Pune: बनावट प्रमाणपत्र दाखल करून नाेकरी मिळवलेल्या तरुणाला सशर्त जामीन
By नम्रता फडणीस | Published: August 16, 2023 06:12 PM2023-08-16T18:12:18+5:302023-08-16T18:12:43+5:30
पोलिस दलात पोलिस शिपाई या पदावर भरती होण्याकरिता बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करून शासनाची...
पुणे : पोलिस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान पुणे ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई या पदावर भरती होण्याकरिता बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर एन. शिंदे यांनी सशर्त जामीन मंजूर केला.
२०२१ मध्ये पोलिस भरती झाली होती. आरोपी हा प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर करून भरती प्रक्रियेत सहभागी झाला हाेता. पडताळणीदरम्यान हा दाखला खोटा अणि बनावट असल्याचे लक्षात आले. त्यावर त्या विद्यार्थीविराेधात चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्याला दि. ४ ऑगस्टमध्ये अटक झाली. यामध्ये या प्रकरणामध्ये आरोपीने सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला.
या प्रकरणात ॲड. नीलेश वाघमोडे यांनी या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. यात विद्यार्थ्याच्या फसवणुकीचा कोणताही उद्देश नव्हता अणि या मुलांना दाखल्याबद्दल माहिती नाही की हा दाखला बनावट आहे की खरा आहे. त्यावर शिक्का अणि सही आहे अणि हा दाखला मुलांच्या फिजिकल ट्रेनरने बनवला आहे. त्यामुळे हे बनावट दाखले तयार करायचे कलम विद्यार्थ्यांना लागू होत नाही. मात्र सरकारी पक्षाने कडाडून विरोध करत जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी केली. दोन्हींचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला. ॲड. नीलेश वाघमोडे, ॲड. महेश देशमुख, ॲड. धैर्यशील पाटील आणि ॲड. अक्षय खडसरे यांनी काम पाहिले.