विद्युतवाहक तारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:29+5:302021-05-08T04:10:29+5:30
निमसाखर ते शेळगाव रस्त्यालगतचे चित्र निमसाखर : निमसाखर (ता. इंदापूर) ते शेळगाव रस्त्यालगतच्या पवारवस्तीजवळ खाली आलेल्या विद्युततारांना कळकाच्या ...
निमसाखर ते शेळगाव रस्त्यालगतचे चित्र
निमसाखर : निमसाखर (ता. इंदापूर) ते शेळगाव रस्त्यालगतच्या पवारवस्तीजवळ खाली आलेल्या विद्युततारांना कळकाच्या बांबूचा आधार आहे. यामुळे परिसरातून जीव मुठीत ठेवून वाहतूक करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यातून अपघाताचा धोका असल्याने रस्त्याकडील दोन्ही विद्युतखांब पुरेशा उंचीचे बसवण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
निमसाखर-शेळगाव हा रस्ता दोन राज्यमार्गांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन जात असताना अनेक जड वाहतुकीबरोबर प्रवाशी दुचाकी व चारचाकी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. अशा प्रकारे वाहतूक होत असताना पवार वस्तीनजीक काही वर्षापूर्वी ऊस ट्रकला विद्युत तारा गुंतल्यामुळे या भागातील विद्युतखांब यापूर्वीच वाकलेले व विद्युततारा खाली आलेल्या स्थितीत होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी विद्युततारा खाली आल्यामुळे एका सिमेंट ट्रकला या तारा गुंतल्यामुळे काही तारा तुटल्या तर परिसरातील खांबही वाकले.
यामध्ये विद्युतप्रवाह वाढल्यामुळे घरगुती मीटरधारकांचे कोणाचे फ्रिज, विद्युत मोटर, बल्ब, फॅन जळाले असल्याचे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले. याच रस्त्यावर खाली आलेल्या विद्युततारांचा झोळ अपघात होऊ नये म्हणून कळकाच्या काटीचा आधार या ठिकाणी देण्यात आला. तोही कळक कुजला असून पुन्हा अपघाताची या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्युत महावितरणने दखल घेऊन रस्त्याच्या कडेला दोन्ही ठिकाणचे विद्युतखांब बदलून पुरेशा उंचीचे खांब बसवावे. याचबरोबर याच मार्गावर कमी उंची असलेल्या आणखी दोन ठिकाणची विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन याही ठिकाणी खांबांची पुरेशा उंचीचे खांब त्या त्या ठिकाणी बसवावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहे.
——————————————————
फोटोओळी—निमसाखर ( ता. इंदापूर) शेळगाव रस्त्यावरील पवारवस्ती भागात रस्ता दुभागणाऱ्या विद्युततारांचा झोळ खाली येत असल्याने बांबूचा आधार दिला आहे.
०७०५२०२१ बारामती—०२
————————————