विविध प्रवाहांतील लोकांचा राजकारणावरील विश्वास व नव्याने प्रवेश ही भारतातील बदलांची नांदी -  नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 01:50 AM2017-09-10T01:50:33+5:302017-09-10T01:51:10+5:30

Confidence of the politics of the people of different streams and new entrance is the beginning of change in India - Neelam Gorhe | विविध प्रवाहांतील लोकांचा राजकारणावरील विश्वास व नव्याने प्रवेश ही भारतातील बदलांची नांदी -  नीलम गोऱ्हे 

विविध प्रवाहांतील लोकांचा राजकारणावरील विश्वास व नव्याने प्रवेश ही भारतातील बदलांची नांदी -  नीलम गोऱ्हे 

Next

पुणे, दि. 10 : “मागील काही वर्षांत भारतीय जनतेत राजकारणाप्रती आस्था निर्माण होत असून त्या निमित्ताने विविध पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. ही एका अर्थाने नव्या युगाची नांदीच आहे. मागील १५ वर्षांच्या तुलनेत २०१५ नंतरच्या काळात हा बदल प्रकर्षाने जाणवत आहेत.  पुणे – मुंबईसारख्या शहरात अनेक विचारवंत आणि सुशिक्षित वर्ग असलेल्या अनेक वॉर्डात ४४ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे चित्र होते. मात्र २०१५ नंतरच्या काळात मात्र हे प्रमाण वाढले आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मध्यमवर्गीयांचा राजकारणाप्रती बदलत असलेला दृष्टीकोन दिसून येत आहे.  लोकांचा राजकारणावर असलेला विश्वास वाढत असल्याने ही एक सहाय्यभूत गोष्ट आहे,” असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, विधानपरिषदेतील प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले. 

यशदा पुणे येथे लेखिका मंजिरी प्रभू आयोजित Pune international Literary Festival 2017  मध्ये त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक भाग म्हणून कार्यरत आहोत. पण गोमांसबंदी, कोणी शाकाहारी राहावे आणि कुणाच्या घरात अंडी खाल्ली जावीत का नाही हे काही मुद्दे मात्र निश्चित चिंताजनक आहेत. मात्र काही गंभीर बाबी दिसून आल्या आहेत. दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्यांच्या बाबत आज त्यांनी संवेदनशील होत त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा कशी आणि कधी होईल हे आपणा सर्वांसमोर मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या काळात इंदिरा गांधीनी आणीबाणी जाहीर केली त्यातून देशातील लोकशाहीला मोठा धडा मिळाला, अनेक लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. 

कोणी म्हणत आहे की हिंदू महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत पण आपण एक पुरोगामी समाजात राहतो. महाराष्ट्रातील सुसंकृतपणा व शिष्टाचार सर्वश्रुत आहेत. मात्र आपल्यासारखा पुरोगामी विचार उत्तरेकडील काही राज्यांत अजूनही तितक्या प्रमाणात रुजले नसल्याने त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आपल्या कुटुंबात अधिक मुले असावीत की नाही याबद्दल प्रत्येक कुटुंबाचा स्वतंत्र मतप्रवाह असू शकतो. हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी यावेळी उलगडून सांगितली.  शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला हिंदू म्हणजे केवळ मंदिरात जाऊन घंटानाद करणारा नसून देशासाठी एकजुटीने एकत्र येणारा समाज म्हणजे हिंदू होय, असे त्या म्हणाल्या.

भारतात असलेल्या लोकशाहीबाबत मत मांडताना त्या म्हणाल्या, “आपण आपल्या हृदयातून लोकशाही स्वीकारली आहे का हे तपासून पाहिले पाहिजे. आज देशात महिलांचे हक्क, मुलांचे संरक्षण, महिलांवर होणारे अत्याचार याबाबत अनेक मागील २० – ३० वर्षांपासून असलेल्या स्थितीत कार्यक्रम होत आहेत. यामुळे या विषयांना जनतेला थेट व्यासपीठ उपलब्ध होत असून सरकारसोबत काम करण्याची संधी मिळत आहे.

सोशल मिडियाचा वाढता वापर हा देशातील अनेक प्रवाहांना पुढे घेऊन  जाण्यात यशस्वी होत आहे. जनतेला विविध विषयांत दिशा दाखवण्याचे काम सोशल मीडिया प्रभावीपणे करीत आहे. मात्र लोकांनी याचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि कुणाची विनाकारण बदनामी होईल अशा क्लिप्स, फोटोग्राफ्स त्वरीत काढून टाकले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

विविध वाहिन्यांवर होत असलेल्या चर्चांना ग्रामीण भागातदेखील चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे ग्रामीण भागातील महिलांना देखील राजकीय, सामाजिक विषयांचे आकलन होत आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तुर्हीन सिन्हा, कॉंग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी आदीनी सहभाग घेतला. ॠषी सुरी यांनी सूत्रसंचालन केले.  याठिकाणी आयोजित पुस्तक प्रदर्शनालाही आ. डॉ. गोऱ्हे यांनी भेट दिली.
 

Web Title: Confidence of the politics of the people of different streams and new entrance is the beginning of change in India - Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.