दोन कारखान्यांवर जप्ती
By admin | Published: January 23, 2016 02:32 AM2016-01-23T02:32:42+5:302016-01-23T02:32:42+5:30
आदेश देऊनही गेल्यावर्षीची थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने राज्यातील दोन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर आयुक्त
पुणे : आदेश देऊनही गेल्यावर्षीची थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने राज्यातील दोन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. सोलापूरमधील स्वामी समर्थ कारखाना आणि बीडमधील जय भवानी कारखान्यावर ही जप्ती आणली गेली आहे. या दोन्ही कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केलेला नाही.
गेल्या वर्षी २०१४-१५ या वर्षात राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही, अशा कारखान्यांवर कडक कारवाईचे सुतोवाच आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार यंदा गाळीप हंगाम सुरू न केलेल्या पण गेल्या वर्षीची एफआरपी थकवलेल्या कारखान्यांना ही रक्कम ठराविक काळात भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्या कालावधीत रक्कम न भरल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोलापूरमधील स्वामी समर्थ कारखाना आणि बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील जय भवानी कारखान्यांवर जप्तीचे आदेश आयुक्तांनी दिले.
स्वामी समर्थ कारखान्याकडे ९ कोटी ७ लाख रुपयांची थकबाकी आहे तर जय भवानी कारखान्याकडे ४ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या संदर्भातील आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना केले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या कारखान्यांकडील साखर आणि इतर मालमत्ता यांचा जाहीर लिलाव करून त्यातून मिळणारे थकबाकीचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील, अशी माहिती सहायक संचालक शरीफ शेख यांनी दिली.
या दोन कारखान्यांबरोबर आणखी पाच कारखान्यांवरही जप्तीची टांगती तलवार आहे. यामध्ये परभणीतील रत्नप्रभा कारखाना, उस्मानाबादमधील भीमाशंकर कारखाना, नांदेडमधील भाऊराव चव्हाण कारखाना, नाशिकमधील के. के. वाघ कारखाना आणि यवतमाळमधील वसंत पुसद कारखान्याचा समावेश आहे.
रत्नप्रभा, भीमाशंकर व भाऊराव चव्हाण या कारखान्यांची या संदर्भातील शेवटची सुनावणी २८ जानेवारीला होणार आहे. तर के. के. वाघ कारखान्याची अंतिम सुनावणी ३० जानेवारी आणि वसंत पुसद कारखान्याची अंतिम सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.
तोपर्यंत ही थकबाकी न भरल्यास त्यांच्यावरही जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व कारखान्यांनी या हंगामात गाळप सुरू केलेले नाही. (प्रतिनिधी)