राष्ट्रवादी विरोधात भाजपही मैदानात, मुंडेंच्या आरोपांना बापटांचे प्रत्यत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 06:02 PM2018-04-12T18:02:52+5:302018-04-12T18:02:52+5:30
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय युद्धात आता धनंजय मुंडे विरुद्ध गिरीश बापट यांच्या संघर्षाची भर पडली आहे. मुंडे यांच्या आरोपांना बापट यांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिले आहे.
पुणे : महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राजकीय वाद रंगलेला असताना त्याचे पडसाद पुण्यातही उमटताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग राष्ट्रवादीच्या हल्लबोल सभेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना गिरीश बापट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या उपोषणात पालकमंत्री गिरीश बापटही सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मुंडे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
बुधवारी झालेल्या हल्लाबोल यात्रेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी तूर डाळ खरेदीत २००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. बापट यांना हा आरोप चांगलाच झोंबला असून त्यांनी त्यावर गुरुवारी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याकडे सध्या काम नसल्याने ते बेछूट आणि तथ्यहीन आरोप करत असल्याचे मत बापट यांनी नोंदवले आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल नव्हे तर डल्लामारो आंदोलन सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान शिरोळे यांच्या उपोषणामध्ये खासदार संजय काकडे यांच्यासह महापालिकेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.