ऑक्सिजन पुरवठ्यावरून तालुक्यांत संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:28+5:302021-04-22T04:11:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उरुळी कांचन/दौंड : संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने आता पुरवठ्यावरून तालुक्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. ...

Conflict in talukas over oxygen supply | ऑक्सिजन पुरवठ्यावरून तालुक्यांत संघर्ष

ऑक्सिजन पुरवठ्यावरून तालुक्यांत संघर्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उरुळी कांचन/दौंड : संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने आता पुरवठ्यावरून तालुक्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. दौंड तालुक्यातील ऑक्सिजन प्रकल्पातून हवेली तालुक्याला पुरविला जाणारा ऑक्सिजन रोखल्याचा आरोप हवेलीने केला आहे. त्यामुळे पूर्व हवेलीमधील रुग्णालयांना १६ तास ऑक्सिजनपासून वंचित राहावे लागले.

दौंड तालु्क्यातील यवत येथे गुरुदत्त एंटरप्राइजेस नामक ६ टन क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहे. येथून पूर्व हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांत ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. मंगळवार (दि.२०) रात्री आठ वाजता दौंड तालुक्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. त्यामुळे तालुका प्रशासनाने उर्वरित भागातील पुरवठा बंद करुन केवळ दौंड तालुक्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजनची कमरता बघता फक्त दौंड तालुक्यापुरता पुरवठा सुरू ठेवला आहे. या प्लॅन्टमधून संपूर्ण तालुक्याचा कोटा पूर्ण होईपर्यंत इतर ठिकाणी ऑक्सिजन पुरवे नये, असे अलिखित आदेशच दौंड तालुका प्रशासनाने काढले. त्यामुळे हवेलीचा ऑक्सिजन पुरवठा तब्बल १६ तासांहून अधिक काळ खंडित झाला असल्याचा आरोप करण्यात आला. ऑक्सिजनच उपलब्ध न झाल्याने कोरोनाच्या महामारीत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांवर उपचार कसा करावा, असा प्रश्न सर्व रुग्णालयांपुढे उभा राहिला.

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की असे कोणीही करू शकत नाही. जिल्हाधिकारी यांनी याबाबत संबंधितांशी बोलून खात्री करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार हवेलीचे अतिरिक्त तहसीलदार विजयकुमार चोबे यांना परिस्थितीचे अवलोकन करून पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनीही जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना या गंभीर समस्येबाबत लक्ष घालून ऑक्सिजनचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दौंड तालुक्यातील अनेक रुग्ण दौंडप्रमाणे हवेलीच्या उरुळी कांचन शहरात उपचार घेत आहेत. दौंड प्रशासनाच्या या भूमिकेवर हवेलीतील नागरिक संतप्त झाले असून, पुढील काळात रेमडेसिविर व ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकाऱी कार्यालयावर ठिय्या मांडू, असा इशारा भाजपचे नेते अजिंक्य कांचन यांनी दिला आहे.

“दौंड तालुक्यातून हवेलीसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा मंगळवारी (दि.२०) रात्रीपासून बंद असल्याची बाब खरी आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यांच्या सूचनेनुसार हवेली तालुक्यातील अधिकाऱ्यांचे पथक घेऊन मी स्वतःया ऑक्सिजन प्लॅन्ट मध्ये जाऊन पुरवठा सुरळीत करणार आहे. पुढील काही तासांतच तालुक्यातील पुरवठा सुरळीत होईल.” - विजयकुमार चौबे, अतिरिक्त तहसीलदार, हवेली

हवेलीला २१४ सिलिंडर दिले

दौंड तालुक्यात आठशे आॕॅक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असताना पाचशे सिलिंडरवर काम भागवावे लागत आहे. दौंडला पाचशे सिलिंडर आले होते. पैकी २१४ सिलिंडर हवेलीला सामाजिक बांधिलकीतून देऊनदेखील कोणी खोटेनाटे आरोप करीत असेल तर ही गंभीर बाब आहे. दौंडला सिलिंडरचा तुटवडा असतां बारामती, पुरंदर, लोणी या परिसरात मागाणी करुनदेखील सिलिंडर मिळत नाही. सर्वत्र तुटवडा असतानाही हवेलीला सिलिंडर दिले. मी हवेलीला सिलिंडर दिले नाही या आरोपात तथ्य नाही. वेळ आल्यास समोरासमोर बसण्याची माझी तयारी आहे. सध्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची परिस्थिती असून विनाकारण चुकीचे आरोप करण्याची वेळ नाही

संजय पाटील

(तहसीलदार, दौंड)

Web Title: Conflict in talukas over oxygen supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.