वादग्रस्त गाळ्यांची मोजणी आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2015 12:38 AM2015-12-21T00:38:28+5:302015-12-21T00:38:28+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांच्या वतीने उद्या दि़ २१ रोजी नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या वादग्रस्त ६१ गाळ्यांची मोजणी करण्यात येणार आहे.
नारायणगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांच्या वतीने उद्या दि़ २१ रोजी नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या वादग्रस्त ६१ गाळ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. मोजणीला ग्रामपंचायत व एक स्थानिक नेता विरोध करण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात मोजणीची तयारी केलेली आहे़ मोजणीसाठी ५० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात असल्याने या मोजणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे़
ही मोजणी सकाळी ९.०० वाजता सुरू होणार असून, नारायणगाव एसटी बसस्थानकालगत असणाऱ्या जुन्नर रस्त्यात साधारण १ कि़ मी़ रस्त्याची मोजणी करण्यात येणार आहे़, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नरचे उपविभागीय अभियंता गणेश पोहेकर यांनी दिली़ या मोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार असून, नारायणगाव-जुन्नर रस्त्यावर बेकायदा जमावबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी दिली़
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दि़ ७ डिसेंबर रोजी नारायणगाव-जुन्नर-मढ राज्य महामार्ग क्ऱ १११ वरील वादग्रस्त ६१ गाळ्यांची मोजणी करण्यात येणार होती़; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वेळेत हजर न राहिल्याने व पोलीस बंदोबस्ताअभावी ही मोजणी स्थगित करण्यात आली होती़
या मोजणीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने अतितातडीची मोजणीकरिता भूमिअभिलेख विभागाकडे ५७ हजार रुपये मोजणी फी भरलेली आहे़
मोजणी स्थगित झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा तत्काळ मोजणी करून घेण्यासाठी पोलीस व भूमिअभिलेख विभागाशी पत्रव्यवहार करून अंतिम मोजणीसाठी दि़ २१ डिसेंबर २०१५ ही तारीख निश्चित केली आहे़ या मोजणीदरम्यान या गाळेधारक व जागामालक, व्यावसायिक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही उपस्थित राहू न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे़
या मोजणीदरम्यान नारायणगाव पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ नये व बेकायदा जमाव जमवू नये, बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी या परिसरात वरिष्ठांच्या परवानगीने जमाव बंदी लागू केली आहे़ (वार्ताहर)