उजनीतील मासेमारी व्यवसायाचा अस्तित्वासाठी संघर्ष

By admin | Published: December 27, 2016 03:02 AM2016-12-27T03:02:30+5:302016-12-27T03:02:30+5:30

उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला

Conflicts for the existence of fish farming in Ujani | उजनीतील मासेमारी व्यवसायाचा अस्तित्वासाठी संघर्ष

उजनीतील मासेमारी व्यवसायाचा अस्तित्वासाठी संघर्ष

Next

कळस : उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला आली. मात्र मासेमारी व्यवसायातील ही प्रगती वाढण्याऐवजी उजनीतील हा व्यवसाय आज अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. २००८ पासून उजनी जलाशयात मत्स्यबीजच न सोडल्याने मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
१९८० ला धरणात पाणी अडवण्यास सुरवात केल्यानंतर मासेमारी व्यवसायालाही जोरात सुरुवात झाली. २००८ पर्यंत हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होता. तेव्हा मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडे होते. मात्र, २००८ मध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून हे हक्क जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाला घरघर लागली. धरणातील मासेमारीवर व्यवसायावर पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील जवळपास ३० हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.
सुरुवातीच्या काळात हमखास रोजगाराचे एक चांगले साधन म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायामध्ये अलीकडच्या काळात अनेक अपप्रवृत्तीने शिरकाव केला आहे. मच्छीमारांकडून मासेमारीसाठी लहान जाळीचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे मत्स्यबीजाची शिकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे माशांच्या पैदासीमध्येही मोठी घट झाली आहे. मत्स्यबीज न सोडल्याचा व परप्रांतीय मच्छीमारांनी केलेल्या बेकायदेशीर मासेमारीमुळे उजनीतील माशांचे उत्पादन पूर्णपणे घटून त्याचा गंभीर परिणाम यंदाच्या मासेमारी हंगामावर झाला आहे.
धरण १०० टक्के भरूनही मच्छीमारांची मासेमारीसाठी सोडलेली जाळी रिकामीच निघत असल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशाच आली आहे. भिगवण व इंदापूर मासळी बाजारात पूर्वी वीस टन माशांची आवक होत असते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही आवक कमी झाली आहे. २००८ नंतर मत्स्यबीजच सोडले नाही. एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे अपेक्षित आहे. मात्र, मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडून जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर धरणामध्ये एकदाही मत्स्यबीज सोडले नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
लहान जाळीतून होणारी मासेमारी, अनेक वर्षांपासून मत्स्यबीज न सोडल्याने आज धरणात मासे मिळणे मुश्कील झाले आहे. वास्तविक पाहता एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे गरजेचे असून गत आठ वर्षांत आठ कोटी मत्स्यबीज सोडणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने केवळ नैसर्गिक पैदाशीवरच धरणातील मत्स्यसंपदा अवलंबून राहिली. त्यातही केवळ चिलापी या घाण पाण्यात वाढणाऱ्या माशाचे उजनीतील प्रमाण वाढल्याने त्याचाही फटका इतर जातीच्या माशांच्या उत्पादनास बसला आहे.
उजनीत सुरुवातीला आढळणारे प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, आहेर, बोदवा, शिंगी, मांगूर रोहू, शिंगटा, गुगळी, झिंगा, गवत्या असे विविध प्रकारचे चवदार मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उजनीतील चिलापीव्यतिरिक्त इतर माशांच्या जाती जवळपास कमी झाल्या आहेत.

Web Title: Conflicts for the existence of fish farming in Ujani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.