पुण्यात लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:15 PM2018-05-03T18:15:41+5:302018-05-03T18:15:41+5:30
हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी दृश्ये चित्रपटात असल्याचे कारण देत आवामी विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला.
पुणे : हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी दृश्ये चित्रपटात असल्याचे कारण देत आवामी विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला.यावेळी चित्रपटाच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. विशेष म्हणजे याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
लग्न मुबारक चित्रपटाबद्दल काही लोकांना आक्षेप वाटत असल्याने त्याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक व कलाकारांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच आवामी विकास पार्टीतील सदस्यांनी प्रवेश करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर लग्न मुबारक नहीं चलेगी, धर्म के नाम पार पिक्चर नाही चलेगा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.तसेच चित्रपटाच्या पोस्टरला काळे फासत पत्रकार परिषद उलथवून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अभिनेते संजय जाधव, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, अभिनेता सिद्धांत मुळे, निर्माते अजिंक्य जाधव, गौरी पाठक आदी उपस्थित होते. या संदर्भात दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कोणत्याही संघटनेला किंवा व्यक्तीला आम्ही हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी दाखवणार नाही.
हा एक रोमांटिक सिनेमा आहे, या चित्रपटातील संवाद, गाणी किंवा दृश्ये यातून कुठल्याही व्यक्तीच्या, धर्मांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेतलेली आहे, आम्ही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डला दाखवला असून सेन्सॉर बोर्डाने कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. या चित्रपटामध्ये कोणत्याही दोन समाज घटकांमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा कोणताही आशय नाही असे सांगत ‘लग्न मुबारक’ मुळे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.