जप्त भाजीपाला होतोय परस्पर गायब, कोथरूड क्षेत्रीय कार्यालयामधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:26 AM2018-06-14T03:26:12+5:302018-06-14T03:26:12+5:30
कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेला भाजीपाला फळे तसेच इतर साहित्य आपोआप नाहीसे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हातावर पोट असणारे आनेक गरीब विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. याला जबाबदार कोण, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.
कर्वेनगर - कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेला भाजीपाला फळे तसेच इतर साहित्य आपोआप नाहीसे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हातावर पोट असणारे आनेक गरीब विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. याला जबाबदार कोण, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.
महापालिकेतर्फे अतिक्रमण कारवाई नागरिकांच्या हितासाठी होत असते आणि अतिक्रमण कारवाईमुळे रस्ते, पदपथ अगदी मोकळे होत आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावर चालताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. वाहतूककोंडी होत नाही, सुखरूप प्रवास होतोे. महापालिकेचे या धडाकेबाज कारवाईबाबत नागरिकाकडून कौतुकही होत आहे.
महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई केल्यानंतर ठराविक वेळेत व्यावसायिकांना दंडात्मक कारवाई करून माल परत देतो. पण, कमीच माल परत मिळत असल्याने छोटे व्यावसायिक महापालिका प्रशासनावर अत्यंत नाराज आहे. हा माल कसा गुप्त होतो, याबाबत अनेक शंका जन्माला येतात; पण संबंधित यंत्रणेने त्यात लक्ष घालावे, अशी मागणी व्यावसायिक करीत आहेत.
माल परत मिळतच नाही...
रोजीरोटीसाठी रस्त्यावर बसणाºया छोट्या व्यवसायिकावर पालिका नियमानुसार कारवाई करते. कायदेशीर प्रक्रिया करून अनेक व्यावसायिकांना जप्त केलेला माल- वस्तू परत देते; पण भाजीपाला, फळे परत घेताना दंडाच्या किमतीएवढाही माल परत मिळत नाही किंवा जप्त केलेल्या अर्धा मालदेखील परत मिळत नाही, असे एका आंबेविक्रेत्याने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले.