वसंत व्याख्यानमालेत गांधीवरुन गाेंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 10:34 AM2019-05-21T10:34:10+5:302019-05-21T10:35:56+5:30
वसंत व्याख्यानमालेत जालियनवाला बाग स्मृतिशताब्दी एका हत्याकांडाची या विषयावर आनंद हर्डीकर यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले हाेते. यावेळी त्यांच्या गांधीजींबाबतच्या वक्तव्यावर श्राेत्यांनी आक्षेप घेतला.
पुणे : वसंत व्याख्यानमालेच्या महिनाभर चालणाऱ्या ज्ञानसत्रातील समाराेपाच्या व्याख्यानात वक्ते आनंद हर्डीकर यांननी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना झालेली फाशी साेडविण्यासाठी गांधीजींनी काेणतेच प्रयत्न केले नाहीत, गांधीजींनी अहिंसा-अहिंसा केले म्हणून ब्रिटिशांनी अन्याय केला. अशा स्वरुपाचे वक्तव्य करीत गांधीजींवर टीकास्त्र साेडले. त्यावर श्राेत्यांनी आक्षेप घेत हर्डीकरांना व्याख्याननाचा राेख बदलविण्यास भाग पाडले. यामुळे उडालेला गाेंधळ व्याख्यानमालेच्या आयाेजकांना शांत करावा लागला.
वक्तृत्वाेत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात दरवर्षी आयाेजित हाेणाऱ्या ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे 145 वे वर्ष हाेते. यंदाच्या व्याख्यानमालेचा समाराेप मंगळवारी हर्डीकर यांच्याय जालियनवाला बाग-स्मृतिशताब्दी एका हत्याकांडाची या विषयाने झाली, मात्र हर्डीकर विषयांतर करुन गांधीजींवर टीका करु लागल्याचा आराेप थेट श्राेत्यांनीच केल्याने गाेंधळ उडाला. कृपया विषयांतर करु नका, असे सांगत काही श्राेत्यांनी हर्डीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत सभागृग बंद पाडले.
व्याख्यानाचा विषय हा जालियनवाला हत्याकांडासंबंधी असताना, हर्डीकर गांधीजींवर घसरल्याचे एका श्राेत्याने सांगितले. गेल्या वीस वर्षांपासून या ज्ञानसत्राच्या अखंड यज्ञाला आवर्जून हजेरी लावणाऱ्या पिंपरीच्या जयराम शिंदे यांनी सभागृहात काय घडले हा अनुभव लाेकमतला सांगितला. ते म्हणाले, की हर्डीकर हे विषय साेडून बाेलत हाेते. गांधीजींवर टीका करीत हाेते. नकाे तिथे सुभाषचंद्र बाेस यांचा विषय आणत हाेते. त्यामुळे श्राेते ओरडायला लागले. विषयांतर करु नका जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी बाेला, त्याबद्दल काय झाले, डायरने काय केले ते सांगा, दाेषींबद्दल बाेला, असे श्राेते म्हणत हाेते.
व्याख्यानमालेत न्यायमूर्ती चपळगावकर, हेरंब कुलकर्णी यांचीही महात्मा गांधी यांच्याशी संबंधित विषयांवर व्याख्याने झाली हाेती. या वक्त्यांनी मांडलेली मते खाेडून काढायचा प्रयत्न हर्डीकर यांनी केला. व्याख्यानमालेच्या इतिहासात वादाचे प्रसंग फार दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. मात्र आजची घटना गंभीर वाटल्याने अनेक श्राेत्यांनी हर्डीकरांचा निषेध करुन सभागृह साेडले. श्राेते बाहेर पडू लागल्यानंतर व्याख्यानमालेचे सचिव डाॅ. मंदार बेडेकर यांनी वक्ते आणि श्राेते या दाेघांनाही शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यासर्व प्रकाराबाबत आनंद हर्डीकर म्हणाले, गांधीजींच्या नेतृत्वावरच माझा आक्षेप हाेता. जाे मी फक्त मांडला. मात्र काही लाेकांना ताे आवडला नाही. लाेक विषयांतर करु नका असे म्हंटले. मला विषयांतर हाेतेय असे वाटले नाही. ब्रिटीशांनी क्रांतिकारकांवर केलेल्या अत्याचारांवर गांधीजींनी काहीच केले नाही, हे सत्य आहे.