म्हाळगी यांच्या व्यक्तिमत्त्वात सैद्धांतिक आणि व्यावहारिक मूल्यांचा संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:48+5:302021-07-10T04:08:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “रामभाऊ म्हाळगी यांच्या व्यक्तिमत्त्वात सैद्धांतिक आणि व्यावहारिक मूल्यांचा संगम होता. त्यांनी आपल्या जीवनात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “रामभाऊ म्हाळगी यांच्या व्यक्तिमत्त्वात सैद्धांतिक आणि व्यावहारिक मूल्यांचा संगम होता. त्यांनी आपल्या जीवनात आदर्शत्वाची उपासना आणि उत्तमतेचा ध्यास घेत कार्यसिद्धधी केली,” असे प्रतिपादन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी शुक्रवारी (दि. ९) केले.
रामभाऊ म्हाळगी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. महापौर मुरलीधर मोहोळ, प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष आणि प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे आदी या वेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही कायदा करणाऱ्या संस्था आहेत. लोकांनी त्यांना वेळ नाही, म्हणून एक करार करून आमदार-खासदारांना सभागृहांमध्ये पाठवलेले आहे. त्याला जर न्याय देणार नसाल तर मग उपयोग काय? आमदार आणि खासदार यांना प्रशिक्षणाची गरज असल्याच्या जाणिवेतून रामभाऊ म्हाळगी संस्थेत ग्रामपंचायतीपासून केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जाते, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली आहे.”
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, “अपमानाच्या गोळ्या गिळायच्या असतात. त्या चघळायच्या नसतात. राजकारणात निष्ठेने पाय पक्के रुजवायचे असतात, असा सल्ला म्हाळगी कार्यकर्त्यांना देत असत. त्यांच्या आदर्शाची पुनरावृत्ती व्हायला हवी. समाजापर्यंत त्यांचे विचार पोहोचायला हवेत. म्हाळगी यांचे भिन्न विचारांच्या मंडळींशीदेखील सौहार्दपूर्ण संबंध होते. सर्वांबद्दल आदराची भावना होती. मात्र, सध्याच्या काळात समाजात वैचारिक अस्पृश्यता पाहायला मिळते. या वैचारिक अस्पृश्यतेने समाजकारण आणि राजकारणाचा पोत बिघडवला आहे.”
रामभाऊ म्हाळगी यांच्यासोबत पुणे आणि मावळमध्ये काम केलेले जुने कार्यकर्ते या वेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे सूत्रसंचालन केले. योगेश गोगावले यांनी आभार मानले.