क्रेडिट सिस्टिमबाबत गोंधळाचे वातावरण : आढावा समिती स्थापन करण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 11:42 AM2019-09-09T11:42:02+5:302019-09-09T11:43:31+5:30
पुणे विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम सुरू केली.
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानंतर आता पदवी अभ्यासक्रमास चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू केले. मात्र, क्रेडिट सिस्टीमची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत अजूनही काही प्राचार्य व प्राध्यापकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे याबाबतचा आढावा घेण्यासाठी तात्काळ समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.
पुणे विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम सुरू केली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सध्या योग्यपणे केली जात आहे. विद्यापीठाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमासाठी सुध्दा केडिट सिस्टीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काही ठिकाणी कार्यशाळा घेतल्या. परंतु, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या संख्या व घेतलेल्या कार्यशाळा या पुरेशा नसल्याचे समोर आले आहे. क्रेडिट सिस्टिम राबविण्याबाबत एक सूत्रता असणे आवश्यक आहे. मात्र,त्यात काही ठिकाणी विसंगती असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.त्यातच सप्टेबर महिन्या उजाडला तरीही महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रेडिट कसे द्यावेत, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रत्येक विद्याशाखेच्या प्रत्येक विषयाचे क्रेडिट कसे दिले जावेत,याबाबतची माहिती उपलब्ध आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी कशी करावी याबाबत प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यातच संलग्न महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयात ठराविक मानधनावर किंवा तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. या प्राध्यापकांना क्रेडिट सिस्टीमच्या अंमलबजावणीबाबत कल्पना दिली जात नाही.त्यामुळे काही महाविद्यालयांमध्ये क्रेडिट सिस्टीम विषयी गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
--
नॅनॉ टेक्नॉलॉजी,बायोटेक्नॉलॉजी आणि पर्यावरणशास्त्र या विषयांचे अभ्यासक्रम तयार करण्यास विद्यापीठाकडून विलंब झाला.या विद्यार्थ्यांना जून महिन्यात प्रवेश दिला.मात्र,सप्टेबर महिन्यात या विषयांचे अभ्यासक्रम प्रसिध्द केले. त्यामुळे या विषयांचे क्रेडिट कोणत्या नियमानुसार द्यावेत,याबबत मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यापीठाला याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
--
विद्यापीठाने क्रेडिट सिस्टीमच्या अंमलबजावणी संदर्भात अहमदनगर,नाशिक व पुणे जिल्ह्यात विविध कार्यशाळा घेतल्या आहेत.त्यात क्रेडिट सिस्टीम विषयी प्राचार्य,प्राध्यापकांच्या शंकांचे समाधान केले आहे.तसेच अंमलबजावणी संदर्भात काही अडचणी आल्यास संबंधित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांशी संवाद साधावा,अशा सूचना दिल्या आहेत.
- डॉ.एन.एस.उमराणी, उप-कुलगुरू ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
.............
पदवी अभ्यासक्रमास क्रेडिट सिस्टीम सुरू करण्यापूर्वी विद्यापीठाने अधिक तयारी करणे अपेक्षित होते. विद्यार्थ्यांची २० गुणांची परीक्षा कशी घ्यावी,याबाबत दोन शेजारच्या महाविद्यालयांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे क्रेडिट सिस्टीम राबविण्याबाबत प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाºयांची वारंवार कार्यशाळे घेणे उपयुक्त ठरेल. तसेच या कर्मचाºयांपर्यंत क्रेडिट सिस्टीमची योग्य पध्दतीने माहिती पोहचली का? याची खात्री करावी लागेल.
- प्रा. नंदकुमार निकम, अध्यक्ष, प्राचार्य महासंघ
क्रेडिट सिस्टीमची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे. महाविद्यालयात सप्टेबर महिन्यात प्रवेश घेलेल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याच्या १६ प्रात्यक्षिक परीक्षा घेणे आणि त्याचे जर्नल पूर्ण करून घेणे, शक्य नाही. आॅगस्ट -सप्टेबर महिन्यात विद्यापीठाकडून अभ्यासक्रम तयार करून दिला जात असेल तर हा अभ्यासक्रम आॅक्टोबर महिन्यापर्यंत शिकवून पूर्ण होणार नाही. या सर्व बाबींचा विचार करून विद्यापीठाने अत्यंत्य सावध भूमिका घेत यावर तातडीच उपाय करण्यासाठी समिती नियुक्त करणे व्यवहारिक होईल.
- डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये सप्टेबर महिन्यातही विज्ञान शाखेत प्रवेश झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या एवढ्या कमी कालावधीत प्रात्यक्षिक परिक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठनांदेड विद्यापीठात क्रेडिट सिस्टीमची अंमलबजावणी करण्यापूर्वी दोन वर्ष तयारी केली. सर्व जिल्ह्यात प्राचार्य,प्राध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या. अंमलबजावणीनंतरही कार्यशाळा घेवून सर्व अडचणी समजून घेतल्या आणि त्यांचे निरसन केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात प्राचार्यांची एक देखरेख समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून महाविद्यालयांचे प्रश्न सोडविण्यात आले. त्यामुळे नांदेड विद्यापीठात केडिट सिस्टीमची अंमलबजावणी चांगल्या पध्दतीने झाली.
- डॉ. पंडित विद्यासागर,माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड