विमानतळाच्या हद्दनिश्चितीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:09 AM2018-07-22T03:09:47+5:302018-07-22T03:10:13+5:30

२ हजार ६४७ हेक्टर क्षेत्र शिल्लक; ‘त्या’ ७ गावांतील अधलेमधले गट घेतल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ

Confusion about the extent of the airport | विमानतळाच्या हद्दनिश्चितीबाबत संभ्रम

विमानतळाच्या हद्दनिश्चितीबाबत संभ्रम

googlenewsNext

वाघापूर : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजुरीच्या जवळपास सर्व प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्याबरोबरच या विमानतळासाठी एकूण किती क्षेत्र लागणार असून कोणत्या गावातील किती गट नंबरपासून हद्द सुरू होते, हेसुद्धा नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, संबंधित गट नंबरनुसार येण्याऐवजी अधलेमधले असल्याने प्रकल्पबाधित क्षेत्रातील शेतकरी पूर्णपणे गोंधळून गेले आहेत.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या ७ गावांमध्ये हा विमानतळ प्रकल्प होत आहे. या सर्व गावांचे एकत्र मिळून २,८३२ हेक्टर क्षेत्र यासाठी संपादित केले जाणार आहे. परंतु, आतापर्यंत प्रत्येक गावाचे एकूण क्षेत्र व प्रकल्पासाठी लागणारे क्षेत्र यांची आकडेवारी तसेच प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यांमध्ये मोठी तफावत असल्याने नक्की किती क्षेत्र जाणार, याबाबत सर्वसामान्य शेतकरी साशंक होता. तसेच, शासनाने केवळ गावठाण वगळण्याचा निर्णय घेतल्याने आपले कसे होणार, याची चिंता शेतकºयांना सतावत होती.
परंतु, या ७ गावांचे एकूण क्षेत्रफळ अथवा एकूण क्षेत्र पाहिल्यास ५,४७९. ११ हेक्टर इतके क्षेत्र आहे. तसेच, विमानतळ प्रकल्पासाठी त्यातील २,८३२ हेक्टर इतके क्षेत्र गेल्यास २,६४७. ११ हेक्टर इतके क्षेत्र शिल्लक राहत आहे. यामध्ये वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांतील शासकीय अथवा गायरान जमीन जात नाही; मात्र उर्वरित गावांचे क्षेत्र समाविष्ट होत आहे. शासकीय जमीन सामविष्ट आहे.

गट नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत; परंतु ते लागोपाठ आले नसून जाहीर करण्यात आलेले क्षेत्र विमानतळ प्रकल्पामध्ये जाणार की या क्षेत्रापासून पुढील क्षेत्र या जाणार, याबाबत शासनाकडून अधिकृत खुलासा झालेला नाही.

त्यामुळे सर्वच शेतकरी चिंतामग्न झाले असून आपले कोणते क्षेत्र जाणार की नाही, याबाबत अजूनही साशंक आहेत. त्यामुळे एकत्र संपूर्ण क्षेत्र प्रथम जाहीर करावे, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

शासनाच्या गट नंबर निश्चितीनुसार आमच्या गावचे जवळपास बहुतेक क्षेत्र या प्रकल्पामध्ये जाणार आहे. परंतु पूर्ण गट नंबर अद्याप समजले नाहीत. तसेच काही गट नंबर मधेच तुटले असल्याने त्यांचा सामावेश होणार किंवा नाही हेही स्पष्ट होत नाही. सध्या तरी या नकाशाच्या कोणतीच दिशा दिसून येत नाही. त्यामुळे आमच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यापुढील काळात संपूर्ण गट नंबर जाहीर झाल्यानंतर सर्वच शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत.
- मनीष हगवण,
शेतकरी, उदाचीवाडी

शासनाने केवळ गावच्या चतु:सीमेवरील गट नंबर दिले असून त्या गटनंबर पासून सर्व क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. जो पर्यंत संपूर्ण क्षेत्र जाहीर होणार नाही. तो पर्यंत कोणाचे किती क्षेत्र जाणार आहे हे स्पष्ट होणार नाही.
- संतोष कुंभारकर,
शेतकरी, वनपुरी

गावठाण वगळणार असे सांगून संपूर्ण क्षेत्र या प्रकल्पात जाणार आहे तर गावठाण वगळून काय उपयोग? गावचा यामुळे काहीच उपयोग होणार नाही, भविष्यात गावठाण क्षेत्र सुद्धा भकास होणार असून आम्हाला गावच सोडून जावे लागण्याची शक्यता आहे.
- रवींद्र फुले, शेतकरी, खानवडी

अर्धवट गटनंबर जाहीर करून शासन आमची फसवणूक करीत आहे. या गट नंबरला कोणताच अर्थ राहत नाही.
- रामभाऊ झुरंगे,
शेतकरी, एखतपूर

Web Title: Confusion about the extent of the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.