जेएम राेडवर पार्किंगबाबत 'कन्फ्युजन ही कन्फुजन है'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 06:02 PM2018-04-24T18:02:56+5:302018-04-24T18:02:56+5:30
जंगली महाराज रस्त्याचे नव्याने करण्यात आलेल्या नुतनीकरणामध्ये पार्किंगसाठी विशिष्ट रचना करण्यात आली अाहे. परंतु या रचनेबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम असून कश्याही प्रकारे वाहन लावली जात असल्याचे चित्र अाहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे जंगली महाराज रस्त्याची नव्याने अाखणी केली. संपूर्ण रस्त्याला एक वेगळे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला गेला. पादचाऱ्यांना सुरक्षितरित्या चालता यावे यासाठी पदपथ वाढवण्यात अाले. त्याचबराेबर बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. लहान मुलांसाठी खेळणी येथे लाव्याण्यात आली. याबराेबरच पार्किंगची विशिष्ट रचनाही याठिकाणी करण्यात अाली. मात्र हिच नव्याने करण्यात अालेली रचना आता वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे चित्र अाहे.
जंगली महाराज रस्ता जिथे सुरु हाेताे, तिथे दाेन्ही बाजूंना पार्किंगची साेय उपलब्ध करुन देण्यात आली अाहे. पदपथाच्या बाजूला विशिष्ट जागा करुन वाहने लावता येतील अशी रचना येथे करण्यात आली अाहे. जेणेकरुन लावलेली वाहने मुख्य रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना अडथळा ठरणार नाहीत. या ठिकाणी कुठल्या प्रकारची वाहने लावायची अर्थात दुचाकी किंवा चारचाकी याची पाटी लावण्यात आली अाहे. बहुतांश ठिकाणी दुचाकीसाठी जागा देण्यात आली अाहे. दुचाकीचालक पदपथाला लागून असलेल्या जागेत अापली वाहने लावत असली तरी अनेक चारचाकी चालक या दुचाकींच्या मागे अापली वाहने लावत असल्याचे चित्र अाहे. परिणामी या ठिकाणी डबल पार्किंग हाेत असून वाहतूकीला अडथळा निर्माण हाेत अाहे. ज्या ठिकाणी चारचाकीसाठी जागा अारक्षित अाहे त्या ठिकाणी काही नागरिक दुचाकीसुद्धा लावत असल्याने नक्की येथे कुठले वाहन लावयाचे याबाबत वाहनचालक गाेंधळून जात आहेत. काही ठिकाणी नुसती पार्किंगची पाटी असल्याने येथे दुचाकी लावायची चारचाकी याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण हाेत असल्याचेही चित्र अाहे. तसेच जेथे कार पार्किंग अाहे तेथे रस्त्याला समांतर गाडी लावायची कि सरळ गाडी लावायची याबाबत वाहनचालकांमध्ये जागृती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कशाही प्रकारे याठिकाणी गाड्या लावल्या जात अाहेत.
जंगली महाराज रस्त्याच्या नव्या रचनेमुळे हा रस्ता वाहतूकीसाठी अरुंद झाला अाहे. पदपथांची रुंदी वाढविल्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या कमी झाली अाहे. नव्या रचनेत पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळाली नसल्याने वाहनचालक कशाही प्रकारे वाहने लावत अाहेत. खासकरुन डबल पार्किंगचे प्रकार नित्याचेच झाले अाहेत. पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात अालेल्या दुचाकींच्या मागे चारचाकी वाहने पार्क केली जात अाहे. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन काढणे अवघड जाते. काही ठिकाणी केवळ स्कूलबस अाणि रिक्षांसाठी जागा अारक्षित करण्यात आली अाहे. तेथेही चारचाकी चालक वाहने लावली जात अाहेत. डबल पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून विशेष कारवाई हाेत नसल्याने दुचाकींच्या मागे चारचाकी लावण्याचा येथे पायंडाच पडला अाहे. या डबल पार्किंगमुळे अाधिच अरुंद झालेला रस्ता अधिक अरुंद हाेत असून सकाळ व संध्याकाळच्यावेळी याठिकाणी वाहतूक काेंडी हाेत अाहे. त्यामुळे वाहनचालकांचा वाहन लावण्याबाबतचा संभ्रम दूर हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.