पालिकेच्या शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:50+5:302020-11-22T09:37:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने २३ नोव्हेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा आदेश काढल्यानंतर पुणे पालिकेने शिक्षकांना कोविड चाचणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने २३ नोव्हेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा आदेश काढल्यानंतर पुणे पालिकेने शिक्षकांना कोविड चाचणी करून घेण्याचा सूचना केल्या. दरम्यान, मुंबई पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोडला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शाळा उघडण्याची तयारी चालू केली आहे. मात्र सत्ताधारी भाजपाने कोरोना रुग्णवाढीचा अंदाज घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
शासनाच्या आदेशांनातर पालिकेनेही २३ नोव्हेंबरनंतर नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यासोबतच पालकांकडून मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र घेतले जात आहे. पालिकेच्या शाळांमध्ये हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायजर आणि मास्क इत्यादी सुविधांची तयारी सुरु झाली. वर्गांची स्वच्छता सुरु आहे.
शाळा सुरू करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्येही फारसा उत्साह नसल्याचे दिसत आहे. पालकही मुलांना शाळेत पाठविण्याच्या बाबतीत साशंक आहेत. अधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासणी अहवालाचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
चौकट
पुण्यात मागील दोन दिवसात रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णवाढीचा अंदाज घेऊन शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय येत्या सोमवारी घेतला जाईल.
- मुरलीधर मोहोळ, महापौर
---------
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात रुग्णामध्ये वाढ होत आहे. सुरक्षेसंबंधी सर्व सूचनांचे पालन शाळांनी करावे. पालक व विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन प्रशासनाने करणे आवश्यक आहे.
- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या