Mhada Exam: परीक्षेत पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांनी पुण्यातून अर्ज केले अन् दुसऱ्या जिल्ह्यात नंबर लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 02:52 PM2022-01-25T14:52:05+5:302022-01-25T14:52:20+5:30

दोन वेळा रद्द झालेली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणची (म्हाडा) ५६५ पदांची सरळसेवा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे

confusion again in the mhada exam students applied from pune and got numbers in other districts | Mhada Exam: परीक्षेत पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांनी पुण्यातून अर्ज केले अन् दुसऱ्या जिल्ह्यात नंबर लागले

Mhada Exam: परीक्षेत पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांनी पुण्यातून अर्ज केले अन् दुसऱ्या जिल्ह्यात नंबर लागले

Next

अभिजित कोळपे

पुणे : दोन वेळा रद्द झालेली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणची (म्हाडा) ५६५ पदांची सरळसेवा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. मात्र, यंत्रणेने यात पुन्हा एकदा गाेंधळ घातला आहे. पुणे केंद्रातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रे दिली आहेत.

एकाचदिवशी सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन सत्रात परीक्षा होणार आहेत. पहिल्या पेपरसाठी सकाळी ८ वाजता केंद्रावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहनव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

म्हाडाची परीक्षा यापूर्वी दोनदा रद्द केली आहे. पहिल्यांदा १२ ते २० डिसेंबर २०२१ यादरम्यान होणार होती. मात्र, ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटल्याचे लक्षात आल्याने या परीक्षा रद्द केल्या. नंतर त्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान होणार होत्या. मात्र, इतरही परीक्षा याच दिवशी असल्याने म्हाडाच्या परीक्षा रद्द केल्या. त्या आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत. मात्र, आरोग्य भरतीप्रमाणेच वेगवेगळ्या जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रे विद्यार्थ्यांना दिली आहेत.

वेळेत पाेहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार

''म्हाडाच्या ५६५ पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) वाटप तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. मात्र, पुणे शहरात विविध शाळा, महाविद्यालये उपलब्ध असताना, २००-३०० किलोमीटरची परीक्षा केंद्रे म्हाडाने विद्यार्थ्यांना का दिली आहेत? या सर्व परीक्षा केंद्रांवर वेळेत पाेहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेची कसरत करावी तर लागणारच आहे, तसेच ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, याचा विचार करणे गरजेचे होते असे एमपीएससी समन्वय समिती महेश घरबुडे यांनी सांगितले.''  

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तेथील केंद्रच देण्यात यावे

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू असून तो अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांना सातारा, सांगली, कराड, अहमदनगर या केंद्रांवर वेळेत पोहोचताना अडचणी येणार आहेत. खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. तसेच आदल्या दिवशी त्या-त्या जिल्ह्यात जाऊन हॉटेल, लॉजवर राहणे अनेकांना परवडणारे नाही. त्यामुळे या बाबींचा विचार करून पुण्यातील विद्यार्थ्यांना किंवा संबंधित शहर, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तेथील केंद्रच देण्यात यावे असे विद्यार्थिनी अदिती भोसले हिने सांगितले.'' 

Web Title: confusion again in the mhada exam students applied from pune and got numbers in other districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.