बारावी परीक्षेवर पर्याय निघत नसल्याने पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:31+5:302021-06-01T04:08:31+5:30
दर वर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन जातात. मात्र, यंदा कोरोनाचा कहर वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, ...
दर वर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन जातात. मात्र, यंदा कोरोनाचा कहर वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. सुरुवातीला मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात परीक्षा घेतल्या जातील असे घोषित करण्यात आले होते. परंतु मे संपला, तरी अजूनही शासन स्तरावर कोणताही निर्णय घेतला नाही. शिक्षणतज्ज्ञांच्या मते बारावीची परीक्षा ऑनलाइन घेणे कठीण असल्याने ऑफलाइनच घ्यावी, अशी मागणी होत आहे. परीक्षा केव्हा होतील आणि त्या कशा पद्धतीने घेतल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तोपर्यंत परीक्षाची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे.
पर्याय काय असू शकतो?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचे लसीकरण करून परीक्षा घेता येतील. पण ऑफलाइनच परीक्षा घेणे योग्य राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनावर अन्याय होणार नाही आणि विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचे चीज होईल. बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करणे योग्य नाही. यासाठी शासनाने परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच विद्यार्थ्यांनी अजूनही वेळ न घालवता अभ्यास नियमितपणे करावा, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
बारावी परीक्षा ही मुलांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातील परीक्षा आहे. यापुढे त्यांच्यातील एक सुजाण नागरिक घडणार असतो. त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन होणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी एक एक गुणासाठी अभ्यास करत असतात. चांगले मार्क मिळाले तर पुढील शिक्षणासाठी मार्ग सोपा होणार असतो.
सुभाष गारगोटे, प्राचार्य -
लॉकडॉऊन शिथिल झाले त्यावेळी तीन महिने विद्यार्थ्याकडून जास्तीत-जास्त अभ्यासक्रम घेतला आहे. उर्वरित ऑनलाइन अभ्यास करून घेतला आहे. हे सगळे करताना प्रत्येक शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागली आहे.ऑनलाइन शिक्षणाने उच्चशिक्षित पिढी घडू शकत नाही. बारावीची परीक्षा घेणे गरजेचे आहे, मग ती कशीही घ्यावी याचा विचार शासन स्तरावर घ्यावा.
पांडुरंग घेनंद, शिक्षक.
वर्षातील काही महिने ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. तसेच, अभ्यासक्रम पूर्ण करत अनेक विषयांची पुनरावृत्ती झाली आहे. बारावीच्या परीक्षाबाबत अजूनही निर्णय घेण्यात आला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लवकर निर्णय घेतल्यास डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले. - यश घाटे, विद्यार्थी