संगणक टायपिंग परीक्षेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:07+5:302021-03-04T04:16:07+5:30
राज्य परीक्षा परिषदेतर्फे शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) मंगळवारपासून सुरू करण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातील सुमारे १ लाख ...
राज्य परीक्षा परिषदेतर्फे शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) मंगळवारपासून सुरू करण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातील सुमारे १ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.परिषदेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील ३०० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार होती. त्यात पुण्यातील सुमारे २२ केंद्रांचा समावेश होता. राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर नियोजित वेळेनुसार परीक्षा झाली. मात्र,काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही परीक्षा घ्यायची की नाही, याबाबत स्थानिक प्रशासन, राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून प्राप्त होणा-या सूचनांमुळे गोंधळ उडाला. पुण्यासह राज्यातील काही ठिकाणी परीक्षा केंद्र बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थेमार्फत परीक्षा परिषदेकडे तक्रारी केल्या. परिषदेला विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी सांगितले.
------------
संकणक टायपिंग परीक्षेसाठी ‘बॅच’ बदलून देणार
राज्य परीक्षा परिषदेकडे संगणक टायपिंग परीक्षेबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.कोरोनामुळे काही परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेणे शक्य झाले नाही. परंतु, एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी बॅच बदलून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करू नये,मात्र,परीक्षा देणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी संगणक प्रशिक्षण संस्थेमार्फत परिषदेला याबाबत कळवणे आवश्यक आहे.
- तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद