सीबीएसईच्या परिपत्रकामुळे गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:00+5:302021-04-28T04:12:00+5:30
सीबीएसई बोर्डाने इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यासाठी सर्व शाळांकडून अंतर्गत परीक्षा ...
सीबीएसई बोर्डाने इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यासाठी सर्व शाळांकडून अंतर्गत परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने मागविले आहेत. बहुतांश शाळांनी फेब्रुवारी महिन्यातच गुण जमा करण्यास सुरुवात केली होती. परंतु, सीबीएसईच्या राज्यातील किती शाळांमध्ये आतापर्यंत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा झाली आहे. परीक्षेशी संबंधित शाळांचे कामकाज कितपत झाले आहे, याचा आढावा घेण्यासाठी शाळांकडून ही माहिती मागविली आहे. याबाबत कोणतीही सक्ती केलेली नाही, असे विविध शाळांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.
कोरोना काळात ‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलाविले जात असून शाळांना बुधवारपर्यत (दि. २८) बोर्डाच्या संकेतस्थळावर सर्व माहिती अपलोड करण्याचे बंधन आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविले जात आहे, असा चुकीचा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. परंतु, किती शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सीबीएसई’ने ही माहिती मागविली आहे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावले जाणार नाही.त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, असे सीबीएसईच्या पुणे विभागीय बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.