अर्थशास्त्राच्या पेपरला गोंधळ
By admin | Published: May 10, 2015 05:15 AM2015-05-10T05:15:33+5:302015-05-10T05:15:33+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून घेतल्या जात असलेल्या प्रथमवर्ष एम.ए.अभ्यासक्रमाच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्र
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून घेतल्या जात असलेल्या प्रथमवर्ष एम.ए.अभ्यासक्रमाच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे शनिवारी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांनी या संदर्भात विद्यापीठाकडे तक्रार केली. त्याचप्रमाणे काही परीक्षा केंद्रांवर सुमारे एक तास उशिराने प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली, अशी चर्चाही केली जात होती. परंतु, सर्व बाबींवर येत्या सोमवारी परीक्षेशी संबंधित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘पेपर सेंटरने परीक्षा विभागाकडे दिलेली प्रश्नपत्रिका परीक्षा विभागाने नियोजित वेळेत परीक्षा केंद्रांवर पाठविली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका उशिरा दिली गेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्यात आले होते का? याबाबत विद्यापीठातर्फे चौकशी केली जात आहे. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याबाबत विद्यापीठातर्फे काळजी घेतली जाणार आहे. येत्या सोमवारी दुपारी २ वाजता परीक्षा मंडळाचे अध्यक्ष, संबंधित विद्याशाखेचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचा अध्यक्ष व पेपर सेटर यांची बैठक होणार आहे. त्यामुळे नेमकी कोणती व कोणाकडून चूक झाली ही बाब समोर येईल. त्यासंदर्भातील अहवाल कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल.