गोंधळ अकरावी प्रवेशाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:13+5:302021-05-13T04:10:13+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नऊ विभागीय मंडळांतर्गत इयत्ता दहावीची परीक्षा होते. या परीक्षेसाठी राज्यातील तब्बल ...

Confusion of the eleventh entry | गोंधळ अकरावी प्रवेशाचा

गोंधळ अकरावी प्रवेशाचा

googlenewsNext

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नऊ विभागीय मंडळांतर्गत इयत्ता दहावीची परीक्षा होते. या परीक्षेसाठी राज्यातील तब्बल १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचे जाहीर केले. त्यामुळे यंदा एकही विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणार नाही. परिणामी इयत्ता अकरावीत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढणार आहे. ही बाब विचारात घेऊनच शासनाला इयत्ता अकरावीच्या प्रवेशाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.

पुणे, मुंबई यासारख्या शहरांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेश यावरून झालेला गोंधळ दरवर्षी पाहायला मिळतो. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणा-या ऑनलाईन प्रक्रियेसाठी अकरापेक्षा जास्त फे-या राबविण्यात आलेल्या आहेत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळेच अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी का? याबाबत ऑनलाइन अभिप्राय मागवून सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ६५ टक्‍क्‍यांहून अधिक जणांनी सीईटी घेण्यास होकार दर्शविला आहे.

सध्या सीईटी घेण्याचे निश्चित झालेले नाही.परंतु, ऑफलाइन सीईटी परीक्षा घेणे शक्य होणार आहे का? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम असावा, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी कसे सामावून घेता येईल, याचा बारकाईने विचार करावा लागणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमध्ये इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचे अंतर्गत एकच प्रश्नपत्रिका देणे उचित ठरणार नाही. त्याचप्रमाणे या परीक्षेची काठिण्य पातळी किती असावी हेसुद्धा निश्चित करावे लागेल.

नेहमीच सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची तुलना केली जाते. 'सीबीएसई'चा अभ्यासक्रम जेईई, नीट आदी प्रवेश पूर्व परीक्षांसाठी पूरक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. तसेच याच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षामध्ये उज्ज्वल यश मिळाल्याचे सुद्धा दिसून येते. त्यामुळे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या सीईटी परीक्षेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांतील जागांवर आपला प्रवेश निश्चित करतील. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पूर्ण तयारी करूनच या परीक्षेला सामोरे जावे लागेल.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि सीईटी घेण्याचा विचार समोर आला. मात्र, इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सीईटी द्यावीच लागते. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांनी दोन वर्षे आधीच आपल्याला स्पर्धेच्या युगात उतरण्याची संधी मिळाली आहे, असा विचार करून सीईटीची तयारी सुरू केली पाहिजे. पालकांनीसुद्धा सीईटी परीक्षेकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी त्यात आपल्या पाल्याचे हित आहे, असा विचार करणे उचित ठरेल.

राज्यातील सर्वच जिल्ह्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश पद्धतीचा अवलंब केला जात नाही. परंतु, यंदा इतर जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी राबविणार याचाही विचार करावा लागेल. ब-याच वेळा इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपल्याच शैक्षणिक संस्थेशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात इन हाउस कोट्याअंतर्गत प्रवेश घेतात. त्यामुळे इनहाऊस कोटा वगळून इतर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचीच सीईटी परीक्षा घेता येईल. या कारणाने सीईटी देणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यास शिक्षण विभागावरील परीक्षेचा ताणही कमी होईल. दुर्दैवाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर या विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने सीईटी घेणेसुद्धा शक्य आहे. मात्र, राज्य शासन आणि शिक्षण विभाग याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे सर्वांसाठीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

- राहुल शिंदे, वरिष्ठ बातमीदार, लोकमत, पुणे

Web Title: Confusion of the eleventh entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.