अकरावी प्रवेशाचा संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:47+5:302021-04-28T04:10:47+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, असा ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. मात्र, त्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. परंतु , अद्याप त्यावर अंतिम निर्णय न झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियाचा संभ्रम कायम आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सीबीएसई, एसएससी व इतर काही राज्यातील शिक्षण मंडळांनी इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे प्रसिद्ध करण्याबाबत चर्चा केली जात आहे. त्याचप्रमाणे इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी कोणते गुण ग्राह्य धरावेत, याचाही विचार केला जात आहे. त्यासाठीच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील प्रमुख शहरांमधील नामांकित महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी यासंदर्भात संवाद साधला. त्यात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, कलमाडी हायस्कूल आदी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मात्र, चर्चेतून समोर आलेल्या कोणत्याही मुद्द्यांवर एकमत झाले नाही. त्यामुळे इयत्ता दहावीच्या निकालाबरोबरच अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून बहुतांश सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. त्यातच दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया वरून गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षेचा पर्यायच उचित ठरेल, असे मत शिक्षण तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
अकरावी प्रवेशासाठी हे आहेत पर्याय
* आठवी व नववी मध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे त्यांना अकरावीमध्ये प्रवेश द्यावा.
*राज्य मंडळाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या निकालाच्या आधारे प्रवेश दिला जावा.
* अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घ्यावी, असे मुद्दे या चर्चेतून समोर आले.