भीमा-पाटसच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ
By admin | Published: October 1, 2016 03:35 AM2016-10-01T03:35:02+5:302016-10-01T03:35:02+5:30
गेल्या १० महिन्यांपासून पगार न दिल्याने सुरू असलेल्या कामगारांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेली भीमा सहकारी साखर कारखान्यांची ३४वी सर्वसाधारण सभा
पाटस : गेल्या १० महिन्यांपासून पगार न दिल्याने सुरू असलेल्या कामगारांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेली भीमा सहकारी साखर कारखान्यांची ३४वी सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. एकीकडे विरोधकांनी कोंडीत पकडले असताना कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अध्यक्ष चांगलेच कोंडीत सापडले होते. विशेष म्हणजे, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारीच अनुपस्थित राहिले होते.
सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी, कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे; सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावर सभासद संतप्त झाले. अरविंद गायकवाड यांनी, ‘कारखान्याच्या जोरावर ज्यांनी आर्थिक पुंज्या भरल्या त्यांनीच हे कर्ज फेडावे.’ सरपंच मनोज फडतरे यांनी, ‘सभासदाला किती पैसे दिले, हे सांगावे आणि नंतरच कोणी किती ऊस घातला, यावर बोलावे. उगाचच कुणाचे समर्थन करू नका,’ असे म्हणताच सभेत वादंग झाले. त्यानंतर एक ७२ वर्षांचे वयोवृद्ध सभासदांचे प्रश्न मांडत असताना त्यांच्या भाषणात व्यत्यय आणून गोंधळ झाला. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर यांनी कारखाना व्यवस्थापनाने भाड्याने लोक आणले आहेत का? असा आरोप केल्याने एकच गदारोळ झाला. दिवेकर यांनी माफी मागावी, या मागणीने जोर धरला. त्यानंतर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे म्हणाले, ‘‘तुमच्या अडचणी ऐकायच्या किती दिवस? कामगारांचे पगार थकले यासाठी त्यांनी मुंडण केले, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.’’ (वार्ताहर)
निषेधसभा
परिस्थिती पाहता काही सभासदांनी राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यामुळे सभा झाली असल्याचे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे, विरोधकांनी या घटनेचा निषेध करून दुसरी निषेध सभा आहे त्याच ठिकाणी घेतली.
...आणि कामगार संतापले
कामगारांनी एकजूट दाखवून काळ्या फिती लावल्या. ते एका बाजूला बसले होते; परंतु सभा अर्ध्यावरच संपल्यानंतर दुसरी निषेध सभा सुरू झाली. या वेळी सत्ताधारी मंडळींच्या काही समर्थकांनी माईक बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माईक बंद करणाऱ्यांवर कामगार संतापले होते.
आमदार आणि कामगारांत कलगीतुरा
कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहूल कुल यांनी कारखान्याची आर्थिक अडचण समजून घ्या, असे पुन्हा आवाहन केले असता, कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत वाबळे भरसभेत उठून म्हणाले, की कामगारांनी मुंडण केले. त्यांना काही वेड लागले नाही. भीक मागायची वेळ आली आहे. आंदोलन करण्यासाठी आम्ही मूर्ख नाही. यावर कुल यांनी वैयक्तिक बोलू नका, असे खडसावले. त्यामुळे कुल व कामगारांत चांगलाच कलगीतुरा रंगला होता.
सभा गुंडाळली नाही.
कारखान्याच्या हितासाठी ३ तास समर्थपणे सर्व प्रश्नांना उत्तरे देत होतो. सभासद उठले आणि सभा संपली. तेव्हा ‘सभा गुंडाळली’ या म्हणण्यात तथ्य नाही. याउलट, कारखाना संकटातून बाहेर कसा निघेल, यावर काही मंडळींकडून सकारत्मक चर्चेची अपेक्षा होती; मात्र तशी चर्चा झाली नाही.
- राहुल कुल,
अध्यक्ष भीमा-पाटस कारखाना