आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ संपेना! प्रवेशपत्रावर पुन्हा चुका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 12:56 PM2021-10-16T12:56:05+5:302021-10-16T13:06:35+5:30
पुणे : मागील महिन्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा होणार होत्या. पण त्यावेळेस झालेल्या गोंधळामुळे त्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. आता ...
पुणे: मागील महिन्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा होणार होत्या. पण त्यावेळेस झालेल्या गोंधळामुळे त्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. आता पुन्हा या परीक्षांचा घोळ काही कमी होत नाहीये. आताही हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे या अडचणींचा उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काळ्या यादीत समाविष्ट असणाऱ्या कंपनीला परीक्षा घेण्याचा अनुभव नसताना तसेच आरोग्य मंत्री यांनी जाहीरपणे न्यासा कंपनी परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचे सांगितले होते, तरी देखील त्याच कंपनीद्वारे परीक्षा घेण्याचा हट्टहास का केला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या महिन्याच्या 24 तारखेला पेपर असल्याने दोन सत्रात पेपरचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य भरतीच्या पेपरमधल्या आयोजनात पुन्हा मोठा गोंधळ दिसत आहे. या परीक्षामध्ये दोन सत्रात पेपर असल्याने उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पदासाठी परीक्षा फी भरण्यात आली नसतानादेखील चक्क त्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट प्राप्त झाले आहे. उमेदवारांना केंद्र निवडण्याचा अधिकार असताना, जे केंद्र उमेदवारांनी निवडली आहेत, ते केंद्र न देता दुसरे लांबचे केंद्र कंपनीच्या वतीने देण्यात आले असून, कंपनीला कोणी अधिकार दिला आहे असे परस्पर केंद्र बदलण्याचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उमेदवारांनी 2 परीक्षासाठी फी भरली असून त्यांना जी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे, ती देखील संधी ह्या कंपनीच्या चुकीच्या व्यवस्थापनेमुळे डावलली जाणार आहे. सकाळी एका जिल्ह्यात पेपर आणि दुसरा पेपर त्यात जिल्ह्यात देणे अपेक्षित असताना दुसरा जिल्ह्यात केंद्र देण्यात आले असून परीक्षेची संधी हिरावून घेण्याचा प्रकार हा कंपनीद्वारे करण्यात आला असून उमेदवारांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी केल्याचे निष्पन्न होत आहे.
एकाच उमेदवाराची एकाच पदासाठी परीक्षा देण्यासाठी त्याची 2 जिल्ह्यात नावे आली आहेत, तसेच वेळ देखील एकच देण्यात आली आहे. एका पदासाठी 430 रुपये फी आकारण्यात आली असता, दोन पदासाठी 860 रुपये खात्यातून डेबिट झाले असता, ज्या पदासाठी अर्ज केला नाही, तसेच फी देखील भरण्यात आली नाही, अशा उमेदवारास हॉलतिकीट आले आहे. यावरून परीक्षा आयोजनामधील गोंधळ समोर आला आहे.