ससून रुग्णालयात बदल्यांवरून परिचारिकांमध्ये संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:58 PM2018-07-09T14:58:20+5:302018-07-09T15:06:52+5:30
बदल्या व संपाबाबत सोमवारी (दि. ९) औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांमध्ये संपाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पुणे : परिचारिकांच्या बदल्यांवरून ससून रुग्णालयातील वातावरण अद्यापही तापलेले आहे. त्यामुळे येथील अन्य परिचारिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बदल्या व संपाबाबत सोमवारी (दि. ९) औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांमध्ये संपाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांच्याविरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन या परिचारिकांच्या संघटनेने बुधवारी (दि. ४) संप पुकारला होता. या संपाविरुध्द काही रुग्णांच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी (दि. ३) सुनावणी होऊन न्यायालयाने राज्य सरकारला डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकांनाही महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायदा २०११, कलम ४ (१) (मेस्मा) लागू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. तर दुसरीकडे ससून रुग्णालय प्रशासनानेही औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने रुग्णालयाच्या ५०० मीटरच्या आत आंदोलन करण्यास मनाई केली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक परिचाारिकांमध्ये संपाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तसेच संपाच्या पार्श्वभुमीवर रुग्णालय प्रशासनानेही बाहेरील रुग्णालयातील परिचारिकांची व्यवस्था केली होती. पोलीस फौजफाटाही बोलाविण्यात आला होता. पण संपाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यानंतरही परिचारिकांच्या बदल्यांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच सोमवारी औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये न्यायालयाच्या निर्णयाकडे प्रशासनासह परिचारिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे संपाबाबत असोसिएशनकडून अद्याप निर्णय घेण्यात आला नसला तरी सर्वच परिचारिकांमध्ये संभ्रम तसेच कारवाईची भीती कायम आहे.