ऑनलाईन डिलिव्हरीचा गोंधळ; दोन केक मागवले आला मात्र एकच! हॉटेलमध्ये २ ग्रुपचे वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:26 PM2022-06-20T15:26:36+5:302022-06-20T15:27:16+5:30
वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले
पुणे : वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. बाणेर रोडवरील हॉटेल ठिकाणा येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन ग्रुप आले होते. त्या दोघांनीही ऑनलाईन केक मागविला जाता. पण, ऑनलाईन डिलिव्हरी देणाऱ्या कंपनीने एकच केक पाठविला. आता हा केक कोणाचा यावरुन त्यांच्यात वाद झाला. एका ग्रुपमधील तरुणीचे ऐकून हॉटेल मालक व बाऊन्सरने तरुणाला मारहाण करुन बाहेर काढले. त्यात त्याचा मित्र जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे.
याप्रकरणी सुस गावात राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ठिकाणा हॉटेलचा मालक व बाऊंसरवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर रोडवरील महाबळेश्वर चौक येथील ठिकाणा बारमध्ये रविवारी मध्यरात्री घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वाढदिवस होता. त्यांचे मित्र, चुलत भाऊ व मैत्रिण असे मिळून वाढदिवस साजरा करण्यासाठी ठिकाणा बार येथे गेले होते. मध्यरात्री बारा वाजता फिर्यादी यांच्या मित्राने मागविलेला केक आणला. त्याच्या शेजारीच आणखी एक ग्रुप वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. त्यांनीही ऑनलाईन केक मागविला होता. मात्र, ऑनलाईन डिलिव्हरी देणाऱ्या कंपनीने एकच केक पाठविला होता. तेव्हा शेजारी बसलेल्या तरुणीने त्यांच्या टेबलवर येऊन तिने तो केक तिच्या बॉयफ्रेडसाठी मागविल्याचे सांगून फिर्यादी यांच्याशी वाद घातला. फिर्यादी हे तिला समजावून सांगत असताना हॉटेलचे बाऊंसर व हॉटेल मालक येथे आले. तेव्हा या तरुणीने हा तरुण आपल्याला त्रास देत असल्याचे बाऊन्सरला सांगितले.त्यांनी फिर्यादी यांच्या शर्टला धरुन त्यांना बाहेर काढले. फिर्यादीच्या मित्रास ढकलून दिले. त्या त्यांच्या डोक्यास लागून ते जखमी झाले. फिर्यादीचा चुलत भावाला ओढत बाहेर आणले. त्यात त्यांच्या डोळ्याचे भुवईवर मारुन जखमी केले. या मित्रावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.