Arogya Vibhag: पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत हॉल तिकीट अन् आसनव्यवस्थेवरून गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 02:03 PM2021-10-24T14:03:53+5:302021-10-24T17:24:36+5:30
पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीट चा नंबर मिळाला नाही
पुणे : राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या परीक्षेची ढकलगाडी करून ठेवली होती. मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या केंद्रावरूनही गोंधळ निर्माण झाला होता. अखेर राज्य शासनाने २४ ऑक्टोबरला परीक्षा होणार असे जाहीर केले. आज संपूर्ण राज्यासहित पुण्यातही आरोग्य विभागाची परीक्षा होत आहे. शहरात परीक्षेत गोंधळ निर्मण झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीट चा नंबर मिळाला नाही. सकाळी १० वाजून गेले तरी विद्यार्थ्यांना आसनव्यवस्था उपलब्ध नव्हती. परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नसणे, पेपर उशीरा सुरू होणे, चूकीची प्रश्नपत्रिका देणे, अशा अनेक समस्यांचा सामना रविवारी झालेल्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना करावा लागला. एकदा नियोजित परीक्षा रद्द करूनही दुस-यांदा परीक्षांच्या नियोजनात सावळा गोंधळ झाल्याचे दिसून आले.त्यावेळी विदयार्थ्यांनी केंद्र प्रमुखांना बोलावण्याची मागणी विद्यार्थांनी केली. यावेळी केंद्र प्रमुखांनी हॉल तिकीट आणि आसनव्यवस्था दोन्ही अडथळे दूर केल्याशिवाय विद्यार्थी परीक्षा देणार नाहीत असे जाहीर केले. उशिरा पेपर सुरु झाल्यावरही विद्यार्थांना वेळ वाढवून दिली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण
विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातील विद्यार्थी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या शहरात परीक्षेसाठी येत असतात. आधीच दोन, तीन वेळा केंद्रांवरून गोंधळ निर्माण झाला होता. आता पुन्हा आसनव्यवस्था आणि हॉल तिकीटयावरून गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत हॉल तिकीट आणि आसनव्यवस्थेवरून गोंधळ #Maharashtra#arogyabharti2021pic.twitter.com/ThRxnP0NaO
— Lokmat (@MiLOKMAT) October 24, 2021
राज्याच्या आरोग्य विभागात ६५०० पेक्षा जास्त गट-क आणि गट-ड पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा आयोजित केली होती. आरोग्य विभागाने २४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान एक पत्रक प्रसिद्ध करत भरती प्रक्रिया पुढे ढकलल्याचे जाहीर केले. परीक्षेला अवघे १०-१२ तास शिल्लक असताना आपण परीक्षा रद्द करण्याचा तुघलकी निर्णय जाहीर केल्या आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आरोग्य विभागाच्या आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निर्णयांचा भोंगळ कारभाराचा आर्थिक फटका गरीब उमेदवारांना बसला होता. त्यानंतर २४ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.