पळसदेव आरोग्य केंद्रात लसीकरणावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:03+5:302021-07-31T04:10:03+5:30
नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. नागरिकांच्या गर्दीमुळे आरोग्य केंद्रावर आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये अनेक वेळा ...
नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. नागरिकांच्या गर्दीमुळे आरोग्य केंद्रावर आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये अनेक वेळा वादावादी होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी (दि. २९) असाच प्रकार या ठिकाणी नागरिकांनी अनुभवला. लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे मोठा गोंधळ झाला. नागरिकांनी येथील कर्मचारी, आशा सेविका यांच्याशी उद्धट वर्तन केले. कोविड टेस्ट करण्यासाठी आलेले लॅब टेक्निशियन सौदागर शिंदे यांच्यावर नागरिक अक्षरश: धावून गेले. त्यामुळे काही वेळा मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी घातलेल्या गोंधळामुळे सुमारे एक ते दीड तास लसीकरण बंद ठेवावे लागले. इंदापूर पोलीस स्टेशनच्यावतीने एक होमगार्ड नियुक्त करण्यात आल्यानंतर लसीकरण सुरू करण्यात आले.
याबाबत ऑपरेटर नीलेश रंधवे व सौदागर शिंदे यांनी बोलताना सांगितले की, नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे. आम्ही धोका पत्करूनदेखील नागरिकांच्या लसीकरण व्हावे यासाठी काम करीत आहे. मात्र, गावातील स्थानिक नागरिक याठिकाणी येऊन आम्हाला अरेरावीची भाषा करतात. येथील आशा सेविका यांच्याशी उद्धट वर्तन करणे ही बाब अशोभनीय आहे. केंद्रावर दररोज एक पोलीस कर्मचारी अथवा होमगार्ड नियुक्त करावा, अशी मागणी या वेळी पळसदेव येथील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी व सेविकांनी केली आहे.
———————————————————
पळसदेव आरोग्य केंद्रावर बंदोबस्तात लसीकरण सुरू आहे.
३००७२०२१ बारामती—०२