काय चाललंय काय? एकावेळी द्या दोन जिल्ह्यात परीक्षा?; आरोग्य विभागाच्या पदभरतीत उमेदवारांमध्ये गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 10:03 PM2021-02-21T22:03:21+5:302021-02-21T22:04:20+5:30
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट (प्रवेश पत्र) देण्यात आले आहे.
पुणे: राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट (प्रवेश पत्र) देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून शासनाने हा गोंधळ दूर करावा, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने २०१९ मध्ये ५२ पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते.तसेच उमेदवारांना पद भरतीच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणा-या विविध पदांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.त्यासाठी प्रत्येक आरोग्य विभागाकडून ३५० शुल्कही आकारण्यात आले. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ५ ते ६ पदांसाठी अर्ज केले.त्यावर उमेदवारांना दोन पदांसाठी अर्ज करता येईल, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार उमेदवारांनी दोन पर्यायांची निवड केली.उमेदवांना परीक्षांचे प्रवेशपत्र २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन उपलब्ध झाले. त्यात दोन्ही परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी होणार असून दोन्ही पदांच्या परीक्षेच्या वेळा, उमेदवारांचे नाव, बैठक क्रमांक सारखे देण्यात आले आहेत. मात्र, परीक्षा केंद्र दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणी परीक्षा देणे शक्य नसल्याने गोंधळाने निर्माण झाला आहे.
"माझ्यासह अनेक उमेदवारांनी दोन पदांसाठी अर्ज केले आहेत. माझ्या दोन वेगळ्या प्रवेशपत्रावर पुणे आणि नाशिक अशी ठिकाणे आली आहेत. दोन्ही परीक्षेचा दिनांक आणि वेळ सारखीच आहे. एक उमेदवार एका वेळेस दोन ठिकाणी परीक्षा देऊ शकणार नाही. प्रवेशपत्रावर अशी चूक होणे हास्यास्पद असून याचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा"
- ज्ञानेश्वर विळेकर, परीक्षार्थी, उमेदवार