अकरावी प्रवेशाचा पसंतीक्रम नोंदवताना विद्यार्थी व पालकांचा गोंधळ; फक्त २ दिवसांचा कालावधी, मुदतवाढ देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 07:02 PM2021-09-02T19:02:25+5:302021-09-02T19:02:33+5:30
गेल्या दोन दिवसात केवळ १० हजार नव्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले असल्याचे दिसून येत आहे.
पुणे : अकरावी प्रवेशाच्या दुस-या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास एकच दिवस दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोषाची भावना असून शिक्षण विभागाने पसंतीक्रम नोंदवण्यास मुदतवाढ द्यावी,अशी मागणी केली जात आहे. गेल्या दोन दिवसात केवळ १० हजार नव्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले असल्याचे दिसून येत आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र,विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यापासून वंचित राहत आहेत. शिक्षण विभागातर्फे दुस-या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी केवळ १ ते २ ऑगस्टपर्यंतचा म्हणजे केवळ दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला. त्यामुळे केवळ दोन दिवसात पसंतीक्रम नोंदवताना विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला.
पहिल्या फेरीतून प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या २५ ते ३० हजाराच्या आत आहे.त्यातच पसंतीक्रम भरल्यानंतर ऑनलाईन प्रवेश मिळूनही तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे प्रवेश अर्जात पसंतीक्रम भरण्यास मुदतवाढ द्यावी,अशी मागणी केली जात आहे.
अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
नोंदणी केलेले विद्यार्थी : ८३,७०२
अर्ज भरून लॉक करणारे विद्यार्थी : ७५,७२२
अर्ज तपासून झालेले विद्यार्थी : ७५,३२२
पसंतीक्रम भरणारे विद्यार्थी : ६८,२९७