तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:46+5:302021-06-23T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव ढमढेरे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मंगळवारी अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील नागरिकांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव ढमढेरे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मंगळवारी अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण होत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. अखेर शिक्रापूर पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला. त्यांनी पुढील लसीकरण सुरळीतपणे पार पाडले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी कोविड लसीकरण होणार असल्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आलेली होती. तसेच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या नागरिकांना मेसेज आल्यामुळे नागरिकांनी सकाळपासूनच प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नागरिकांना रांगेत उभे करून नंबरप्रमाणे नावनोंदणी करून घेण्यात आलेली असताना अचानकपणे काही नावे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घेण्यात येत असल्याचे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ होऊन नागरिकांमध्ये वाद होऊ लागले. याबाबतची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना मिळताच त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत या ठिकाणी धाव घेत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे नाव असलेली यादी स्वतःच्या हातात घेऊन नागरिकांना रांगेत उभेत करून घेत लसीकरण सुरळीत करून दिले. मात्र यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांबाबतची तफावत पोलिसांसमोर उघड झाल्याने नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली.
चौकट :
तळेगाव ढमढेरे येथे लसीकरणासाठी अचानकपणे जास्त नागरिक आले होते त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ झाला. मात्र, आम्ही त्या ठिकाणी जात नागरिकांना शांत करून लसीकरण सुरळीतपणे सुरु केले.
-राजेश माळी,पोलीस उपनिरीक्षक
चौकट:
नागरिकांमध्ये अचानक गोंधळ झाला
आज प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त २०० लस उपलब्ध झालेल्या होत्या. मात्र, नागरिकांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नंबरप्रमाणे लसीकरण सुरू असताना अचानक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ होऊन वाद होऊ लागले. याबाबत आम्ही पोलीस ठाण्याला कळविले होते. त्यांनतर पोलिसांनी येत लसीकरण सुरळीत करून दिले आहे
- डॉ. प्रवीण शिंदे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ढमढेरे
फोटो: तळेगाव ढमढेरे येथे लसीकरण दरम्यान झालेल्या गोंधळ प्रसंगी नागरिकांना शांत करत लसीकरण सुरळीत करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.