मतदार याद्यांचा गोंधळ
By admin | Published: February 22, 2017 03:11 AM2017-02-22T03:11:33+5:302017-02-22T03:11:33+5:30
मतदार याद्यांचा अनुक्रमांक बदलल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाल्याचे वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये
वाघोली : मतदार याद्यांचा अनुक्रमांक बदलल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाल्याचे वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये मतदानाच्या दिवशी पाहावयास मिळाले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतिम यादी गटामध्ये एकत्रित अनुक्रमांकानुसार निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली असली, तरी मतदार विधानसभेच्या यादी भागानुसार शोधत होते. यामुळे मतदान केंद्र शोधताना मतदारांचे प्रचंड हाल झाले.
वाघोली-आव्हाळवाडी गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाल्यानंतर, तत्काळ नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. सकाळी मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारांनी विधानसभेच्या यादी भाग क्रमांकानुसार अनुक्रमांक सांगितला असता, अनेकांचे क्रमांकच चुकीचे निघाले.
जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानासाठी आलेल्या नागरिकांना सातव हायस्कूलमध्ये पाठविण्यात येत होते, तर सातव हायस्कूलमधून जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठविण्यात येत होते. अनेक मतदारांमध्ये सकाळपासूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारांना देण्यात आलेल्या याद्यांच्या साहाय्याने व निवडणूक आयोगाच्या मदत केंद्राच्या मदतीने नागरिकांना यादीतील अनुक्रमांक सांगण्यात आले. मात्र, यामध्ये वृद्ध, महिला आणि अपंगांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, तर वॉर्ड क्रमांक तीनमधील काही नावे वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गेल्याने अनेकांचा गोंधळ उडाला.
मतदार याद्यांचा घोळ निर्माण झाला असला, तरी सकाळपासून मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषद गटातील वाघोलीसह केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, भावडी, तळेरानवाडी या गावांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत उत्साहाचे वातावरण होते. (वार्ताहर)
गटात ७० टक्के मतदान
वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सरासरी ७० टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी असणारा उत्साह जाणवून येत असल्याने ७० टक्क्यांच्या वर मतदान होईल, असा उमेदवारांनी व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला.
वॉर्ड क्रमांक ६ हाउसफुल्ल
खुल्या प्रवर्गासाठी असणाऱ्या आव्हाळवाडी पंचायत समिती गणामध्ये वाघोलीतील वॉर्ड क्रमांक सहा येत असल्याने, या ठिकाणी सर्वच उमेदवारांच्या नजरा लागून होत्या. वाघोलीत सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून वॉर्ड क्रमांक ६ च्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अगदी मतदानाची वेळ संपेपर्यंत नागरिकांनी गर्दी केल्याने दिवसभर हा वॉर्ड हाउसफुल्ल होता.