युतीसाठीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच!
By admin | Published: January 13, 2017 03:06 AM2017-01-13T03:06:05+5:302017-01-13T03:06:05+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपाची युती करण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. कोणाला किती जागा सोडायच्या याबाबत एकमत झालेले नाही. आचारसंहिता लागली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपाची युती करण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. कोणाला किती जागा सोडायच्या याबाबत एकमत झालेले नाही. आचारसंहिता लागली, तरी युतीबाबत निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला थोपविण्यासाठी भाजप-शिवसेनेने युती करावी, याबाबत फक्त चर्चाच सुरू आहे. सोमवारी रात्रीही बैठक झाली. खासदार श्रीरंग बारणे, अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते. त्यानंतर बुधवारी याबाबत बैठक होणार होती. मात्र, भाजपाच्या काही नेत्यांना दिल्लीला जावे लागल्याने बैठक झाली नाही. १२८ जागांपैकी कोणाला किती, यापेक्षा पक्षाची ताकत व उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता पाहून जागांचे वाटप करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
जागावाटपात एका प्रभागात चार जागा असल्याने प्रत्येकी दोन-दोन उमेदवार, असा फॉर्म्युला मांडण्यात आला. तसेच गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते कोणाला आहेत, त्यानुसार वाटप करायचे, असाही प्रस्ताव होता. मात्र, त्यावर फारशी चर्चा झाली नाही. भाजपाचे प्रभाव क्षेत्र असणाऱ्या परिसरात तीन-एक व शिवसेना प्रभावक्षेत्र असणाऱ्या परिसरात तीन-एक असाही फॉर्म्युला ठेवण्यात आला. (प्रतिनिधी)