अभिनंदन, चिमटे व ओरखडेही

By admin | Published: March 16, 2017 02:07 AM2017-03-16T02:07:46+5:302017-03-16T02:07:46+5:30

अभिनंदनाबरोबरच चिमटे, स्वागताबरोबरच थोडे ओरखडे व तुमच्याबरोबरच राहू असे सांगतानाच ‘चुका कराल तर धारेवरही धरू’ असा इशाराही.

Congratulations, tongs and scratches | अभिनंदन, चिमटे व ओरखडेही

अभिनंदन, चिमटे व ओरखडेही

Next

पुणे : अभिनंदनाबरोबरच चिमटे, स्वागताबरोबरच थोडे ओरखडे व तुमच्याबरोबरच राहू असे सांगतानाच ‘चुका कराल तर धारेवरही धरू’ असा इशाराही... महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अभिनंदनाची पहिलीच सभा बुधवारी दुपारी अशी रंगली. मतदानाच्या वेळखाऊ प्रक्रियेने कंटाळलेल्या नव्या सदस्यांच्या चेहऱ्यावर जुन्या सदस्यांच्या या शाब्दिक आतषबाजीने चांगलेच हास्य फुलविले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी तर त्यांच्या स्वागतपर भाषणात फुलबाज्यांबरोबरच काही राजकीय लंवगी फटाकेही लावले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी त्यांना चांगले प्रत्युत्तर दिले. मावळते महापौर प्रशांत जगताप यांनी नव्या महापौर मुक्ता टिळक यांना अनुभवी सल्ल्याबरोबरच काही धडेही दिले. टिळक यांनीही त्यांना ‘मागच्या पंचवार्षिकमध्ये मी समोर असताना काय चालायचे ते पाहिले आहे’ असे म्हणत आहेर परतावणी केली. उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी ‘पुण्याच्या विकासासाठी आपण सगळे एकत्र राहू’ अशी ग्वाही दिली.
चेतन तुपे म्हणाले, ‘‘भाजपाला सत्ता मिळाली, तुम्ही महापौर झालात याचा आनंद आहे, पण महापालिकेत आज विनापरवाना फ्लेक्स लावले, इमारतीवर विद्युत रोषणाई केली, रांगोळी खराब होईल, म्हणून सुरक्षारक्षक आमची गाडी आत सोडेनात, हा काय प्रकार आहे, हे योग्य नाही. महापालिकेची मालकी तुमच्याकडे आलेली नाही. कारभारी बदलला आहे. मुंबईत तुम्ही शिवसेनेला आम्ही पहारेकरी राहू, असे बजावले आहे. मी तसे सांगणार नाही, तुमच्याबरोबरच राहू, पण अयोग्य करत असाल तर ते सांगण्याची खबरदारीही घेऊ. उपमहापौर नवनाथ कांबळे चळवळीतील आहेत. त्यांच्या गटाला वेगळी मान्यता देण्यास नकार मिळाला म्हणून ते आता भाजपाचेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला हे चालणार आहे का, याचा त्यांनी विचार करावा.’’
अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘विरोधी पक्षात असताना तुम्ही ‘कामकाजात पारदर्शकता हवी’, ‘ते काम असे व्हायला हवे होते’, ‘या कामात ही त्रुटी आहे’ म्हणून भाषणे करीत होता. आम्ही सत्तेत होतो व ऐकत होतो. आता तुम्ही सत्तेत आहात. तुमचे शब्द तुम्हीच लक्षात ठेवून कारभार केला पाहिजे, नाही केला तर आम्ही बोलणार. ते तुम्हाला ऐकावे लागेल व कामकाजात सुधारणाही करावी लागेल. रिपाइंला बरोबर घेतले आहे, त्यांच्या मतांवरच तुमची सत्ता आली आहे, हेही लक्षात घ्या. नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद कोणत्या जातीमुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळाले आहे, अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला.
मावळते महापौर जगताप म्हणाले, केंद्रात, राज्यात सत्ता आहे, पण महापालिकेत नाही, असे तुम्ही सांगत होता. आता इथेही तुमची सत्ता आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणताही बहाणा करता येणार नाही. महापौर कोणत्याही पक्षाचा नसतो. याच विचाराने मी कामकाज केले. तुम्हीही तसेच करायला हवे. बहुमताच्या जोरावर पुणेकरांना अहितकारक असा कोणताही निर्णय घेतला गेला तर आम्ही सभागृहात व सभागृहाबाहेरही तुमचा विरोध करू.
दीपक मानकर यांनी सन २००७ मध्ये टिळक यांनी महापौरपदाची निवडणूक लढवली व त्यात त्यांचा पराभव झाला, असे सांगत त्याचवेळी मी ‘तुम्ही महापौर व्हा, एक भाऊ म्हणून तुमची पाठराखण करू’ असा शब्द दिला होता याचे स्मरण दिले. माधुरी सहस्रबुद्धे, अविनाश बागवे, मुरली मोहोळ, नाना भानगिरे, मंगला मंत्री, चंचला कोद्रे, हेमंत रासने, विशाल धनवडे, वैशाली बनकर, सुनील कांबळे, वसंत मोरे, धीरज घाटे, रेश्मा भोसले, डॉ. सिद्धार्थ धेंडे आदींची टिळक व कांबळे यांचा गौरव करणारी भाषणे झाली.
सभागृह नेते भीमाले म्हणाले, अभिनंदनाच्या भाषणात राजकारण आणू नये, असा संकेत आहे, मात्र सहकारी मित्रांनी तो आणला. हरकत नाही. आमचा विचार पुण्याचा विकास व तोही सर्वांना बरोबर घेऊन करण्याचाच आहे. पारदर्शीपणे कामकाज करण्यालाच प्राधान्य दिले जाईल. पुणेकरांच्या हिताचेच काम केले जाईल. उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. एकत्र राहू व एकत्रच काम करू, शहराच्या विकासाआड काहीही येऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
उत्तरादाखल केलेल्या भाषणात मुक्ता टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या वारशाचा अभिमानाने उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करीत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचेही स्मरण केले. अभिनंदनाच्या भाषणांनाही विरोधाची किनार होती, पण ते पुण्याचे वैशिष्ट्यच आहे, असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, ‘‘भाजपाचा महापौर ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पिढ्यान्पिढ्या केलेल्या परिश्रमाचे फळ आहे, याची जाणीव कायम असेल. विकासासाठी निधी लागतो. तो मिळवताना काही कठोर निणर्य घ्यावे लागतील, कडू औषधानेच रोग बरा होतो.’’ पर्यावरण विषयक उपक्रम दरमहा राबविण्याचा विचार आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारणा, महिला सुरक्षा यालाही प्राधान्य देऊ, असे टिळक म्हणाल्या.
(प्रतिनिधी)

Web Title: Congratulations, tongs and scratches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.