कॉंग्रेसचे तेच ते आणि तेच ते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:41+5:302021-02-06T04:19:41+5:30
पुणे : कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर राज्याची कार्यकारिणी जाहीर झाली. यात पुण्यातून चार कॉंग्रेस नेत्यांना संधी ...
पुणे : कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर राज्याची कार्यकारिणी जाहीर झाली. यात पुण्यातून चार कॉंग्रेस नेत्यांना संधी मिळाली. मात्र याचा विशेष आनंद पुण्याच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त झालेला दिसला नाही. किंबहुना तीच ती नावे आणि तेच ते पदाधिकारी आम्ही कुठवर पाहायचे, असाच नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे.
ऐंशी-नव्वदीच्या दशकापासून कॉंग्रेसमध्ये विविध पदांवर आणि निवडणुकांमध्ये संधी मिळालेल्याच चेहऱ्यांनाच संधी मिळणार असेल तर पक्षातील तरुणांनी काय करावे, असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. पुण्यातून दोन नेत्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्याने पुण्यातील कॉंग्रेसची ताकद वाढणार का, या प्रश्नावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून फार सकारात्मक उत्तर पुढे आलेले नाही.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील कॉंग्रेसला बळ देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रदेश कॉंग्रेसकडून तरुण नेतृत्त्वाला संधी मिळायला हवी. नव्या चेहऱ्यांवर जबाबदारी टाकायला पाहिजे, असा प्रवाह कॉंग्रेसमध्ये दिसतो आहे. मात्र कारवाईच्या भीतीने जाहीरपणे बोलण्याची कोणाचीही तयारी नाही.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना प्रदेश पातळीवर संधी मिळाल्याने पुण्याचे शहराध्यक्षपद बदलले जाणार का, हा मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. शहराध्यक्षपद सोडण्यासंदर्भात बागवे यांना अद्याप निरोप आलेला नसला तरी पक्ष सांगेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याची तयारी त्यांनी प्रदर्शीत केली आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती होण्याआधीपासूनच बागवे यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. आता प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पक्ष देणार नाही, असे गृहीत धरून काही नेत्यांनी आता शहराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.