काँग्रेसचे अरविंद शिंदे म्हणजे ‘गजनी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:47+5:302021-02-25T04:13:47+5:30
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या संसर्गाचा विसर काँग्रेसचे नगरसेवक ...
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या संसर्गाचा विसर काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांना पडला असून ते विस्मरण झालेले ‘गजनी’ असल्याचे टीका शिवसेनेने केली आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास राज्य शासन परवानगी देत नसल्यामुळे शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेवर टीका केली होती. ‘मुंबई महापालिकेतील गैरप्रकार समोर येण्याची भीती वाटत असल्याने शिवसेनेला सर्वसाधारण सभा नकोय का?’ असा प्रश्न उपस्थित करीत चिमटे काढले होते. ही टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून त्यावर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे आणि पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांना त्याचे विस्मरण होत आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या सर्व प्रकारच्या बैठका ऑनलाईन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु, शिंदे यांची पालिकेतील पक्षनेतेपदाची जबाबदारी काढून घेतल्यामुळे ते ‘अतृप्त आत्म्या’सारखे वागत आहेत. यामुळे आलेल्या नैराश्यामधून कदाचित ते पालिकेच्या सभेची नियमावली विसरले असावेत असे मोरे म्हणाले.
शिवसेनेने भ्रष्टाचाराला कधीही पाठीशी घातले नाही. भविष्यातही कधी पाठीशी घालणार नाही. शिंदे यांचे विधान काँग्रेस शहराध्यक्ष पदावर डोळा ठेवून पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठीचा प्रयत्न आहे. हे वक्तव्य पक्षाची अधिकृत भूमिका आहे की शिंदे यांचे वैयक्तिक मत आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी मोरे आणि सुतार यांनी केली आहे.